पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकरी चिंतेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:26 AM2021-07-01T04:26:21+5:302021-07-01T04:26:21+5:30
तळमावले : पाटण तालुक्यातील तळमावले व ढेबेवाडी विभागात कोळपणीच्या कामांना वेग आला आहे. शिवारामध्ये सगळीकडे शेतकरी शेतामध्ये कोळपणीचे काम ...
तळमावले : पाटण तालुक्यातील तळमावले व ढेबेवाडी विभागात कोळपणीच्या कामांना वेग आला आहे. शिवारामध्ये सगळीकडे शेतकरी शेतामध्ये कोळपणीचे काम करताना दिसत आहेत. मान्सूनपूर्व आणि पेरणीनंतर पाऊस झाल्यामुळे सर्व पिके चांगली आली आहेत. मात्र, गत पंधरा दिवसांपासून पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. सोयाबीन, भुईमूग, ज्वारी, मका भात व इतर कडधान्य, खरीप हंगामातील पिके चांगल्या प्रकारे आली असून, पिकांना पावसाची गरज आहे.
राष्ट्रवादीतर्फे पत्र मोहिमेचे आयोजन
कऱ्हाड : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने ‘एक पत्र मराठा युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी’ ही मोहीम राबविण्यात आली होती. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने राज्यभरातून एक कोटी पत्र पाठविणार असल्याची घोषणा युवक प्रदेश अध्यक्ष मेहबूब भाई शेख यांनी केली होती. या मोहिमेस कऱ्हाडातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कऱ्हाड दक्षिण उपाध्यक्ष सागर देसाई, सूरज जाधव, विक्रम नलवडे, महेश गायकवाड, विक्रम सातपुते, अथर्व साळुंखे उपस्थित होते.
पैशाचे पाकीट प्रामाणिकपणे केले परत
पाटण : अकलूज-चिपळूण बसमधून सीताराम येडगे हे प्रवास करीत होते. येडगे यांचे पैशाचे पाकीट बसमध्ये सीटखाली पडले. बस चिपळूणच्या दिशेने रवाना झाल्यानंतर वाहक सचिन ज्ञानदेव गरगडे यांना सीटखाली पाकीट सापडले. त्यामध्ये वीस हजार रुपये तसेच कागदपत्रे होती. त्यानंतर वाहक गरगडे यांनी कोयनानगर येथील किराणा दुकानदार रवींद्र गोळे यांच्या सहकार्याने सीताराम येडगे यांच्याशी संपर्क साधून त्यांना पैशाचे पाकीट परत केले.