पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:24 AM2021-07-12T04:24:24+5:302021-07-12T04:24:24+5:30
वरकुटे-मलवडी : गेल्या दोन वर्षांत समाधानकारक पाऊस झाल्याने माणमधील राणंद, आंधळी व पिंगळी तलावात सध्या बऱ्यापैकी पाणीसाठा शिल्लक असून, ...
वरकुटे-मलवडी :
गेल्या दोन वर्षांत समाधानकारक पाऊस झाल्याने माणमधील राणंद, आंधळी व पिंगळी तलावात सध्या बऱ्यापैकी पाणीसाठा शिल्लक असून, ऐन पावसाळ्यात लोधवडे, गंगोती, मासाळवाडी येथील तलावांत ठणठणाट आहे. तर जांभुळणीसह माण पूर्व भागात असणाऱ्या इतर तलावांतही केवळ दहा टक्के पाणीसाठा उरला आहे. त्यातच पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदाही पुरेसा पाऊस होऊन सर्व तलाव भरतील, अशी अपेक्षा माणवासीयांनी व्यक्त केली होती. मात्र कधी-कधी माणवासीयांना पावसाच्या लहरीपणाचा फटका बसून लोकांना दुष्काळाला सामोरे जावे लागते, हा आजपर्यंतचा इतिहास आहे. पिण्याच्या पाण्यासाठी टँकर तर जनावरांसाठी छावणीचा आधार घ्यावा लागतो. मात्र, गेल्या दोन वर्षांत पडलेल्या पावसाला पाणी फाऊंडेशनच्या बळाची अन् जलसंधारणाची साथ मिळाल्याने सध्या परिस्थितीत बदल दिसत आहे. गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने तालुक्यातील सर्वत्र पाणीसाठे 'ओव्हरफ्लो' झाले होते. त्यामुळे यंदाही दुष्काळाच्या धगीपासून लोकांची सुटका झाली. मे महिन्यात काही भागात अवकाळी तर सर्वत्र झालेल्या वळवाच्या पावसाने थोडाफार दिलासा दिला होता. मात्र, काही शेतकऱ्यांना नुकसानीचा फटकाही सोसावा लागला.
तालुक्यातील गावोगावी झालेल्या जलसंधारणाच्या कामामुळे पावसाचे पाणी ज्या-त्या भागात साचून राहिल्याने अद्याप मोठ्या जलसाठ्यांपर्यंत पाणी पोहोचले नव्हते. त्यामुळे तलावांतील पाणीपातळी घटत गेली आहे. सध्या सर्वत्र कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत असला तरी माण तालुक्यातील लोधवडे, गंगोती, मासाळवाडी येथील तलाव अजूनही कोरडे आहेत. तर जांभूळणी,जाशी व ढाकणी तलावांत दहा टक्क्यांहून कमी पाणीसाठा उरला आहे. आंधळीसह पिंगळी व राणंद तलावात पुरेसा पाणीसाठा आहे. पिंगळीच्या तलावात ५२ टक्के पाणीसाठा आहे तर आंधळी तलावात ३७.५५ तर राणंदमध्ये २५ टक्केच वापरण्यायोग्य पाणीसाठा आहे. यंदा पावसाचा जोर कायम राहिल्यास सर्व तलाव लवकरच भरण्याची शक्यता आहे.
वरकुटे मलवडी
फोटो : वरकुटे-मलवडीतील पडळकर तलावात दहा टक्के पाणीसाठा उरलेला आहे.