वैयक्तिक स्थानिक वाहनांना २७५ रुपयांचा फास्टॅग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:47 AM2021-02-17T04:47:24+5:302021-02-17T04:47:24+5:30
पाचवड : राष्ट्रीय महामार्गावरील आनेवाडी टोलनाक्यावर सोमवारी मध्यरात्रीपासून फास्टॅगची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. सुरुवातीच्या एक-दोन तासांमध्ये ...
पाचवड : राष्ट्रीय महामार्गावरील आनेवाडी टोलनाक्यावर सोमवारी मध्यरात्रीपासून फास्टॅगची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. सुरुवातीच्या एक-दोन तासांमध्ये वाहनचालकांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाल्याने टोलनाक्यावर तणाव निर्माण झाला होता. मात्र त्यानंतर मंगळवारी दिवसभर फास्टॅगची यंत्रणा वापरून सुरळीतपणे टोल घेण्यात आला.
दरम्यान, फास्टॅग सुविधा न वापरणाऱ्या अनेक वाहनांवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून दंडासह टोल वसूलही करण्यात आला. महामार्गाच्या सातारा ते पुणे व पुणे ते सातारा या दोन्ही बाजूकडील सर्व लेनवर फास्टॅग सुविधेचा वापर आनेवाडी टोल प्रशासनाकडून करण्यात आला आहे. फास्टॅगबाबत स्थानिक वाहनचालकांमध्ये अनेक उलट-सुलट चर्चा होती. मात्र आनेवाडी टोलनाका प्रशासनाने वैयक्तिक स्थानिक वाहनांना २७५ रुपयांचा फास्टॅग देण्यात येणार असल्याचे सांगून स्थानिक व्यावसायिक वाहनांनासुद्धा फास्टॅगमध्ये ३३ टक्के सवलत दिली असल्याचे उपस्थित पत्रकारांना सांगितले. त्यामुळे स्थानिक वाहनचालकांनी फास्टॅगबाबत संभ्रम निर्माण न करता या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
चौकट :
टोल भरण्यासाठी फास्टॅगची सुविधा सक्तीची केल्यानंतर ज्या वाहनांनी फास्टॅग काढला नाही, अशा वाहनांना फास्टॅग काढून देण्याची सुविधा टोलनाक्यावर उपलब्ध करून देण्यात आलेली होती. त्याठिकाणी फास्टॅग काढण्यासाठी वाहनचालकांनी मोठी गर्दी केली होती.
चौकट :
नेहमी वाहनांची रेलचेल असलेला टोलनाका आता विनारांग सुरळीतपणे सुरू असलेला पाहावयास मिळत आहे. मात्र फास्टॅग सुविधा सुरू झाल्याने येथे काम करणारे अनेकजण बेरोजगार झाले आहेत. कॅशलेस सुविधेमुळे अनेकांच्या रोजीरोटीवर गंडांतर आले आहे .
फोटो ओळ :
आनेवाडी टोलनाक्यावर फास्टॅग घेण्यासाठी वाहनधारकांनी गर्दी केली होती.