ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचे गावासाठीही उपोषण !
By admin | Published: November 19, 2014 09:50 PM2014-11-19T21:50:50+5:302014-11-19T23:27:06+5:30
तरुणांचाही सहभाग : वीज कंपनीने मागण्या केल्या मान्य
वरकुटे मलवडी : गावातील अडीअडीचणी, समस्या सोडवायच्या असतील. संबंधितांकडे काही मागण्या करायच्या असतील, तर गावातील गटातटाने मतभेद न ठेवता एकत्र यायचे असते. विकासासाठी असे पाऊल आवश्यक असते. तरच गावाचा विकास होतो. पण , वरकुटे मलवडी येथील ग्रामपंचायतीचा कर्मचारी व काही तरुणांनी वाढीव बिलांच्या विरोधात आणि इतर काही मागण्यांबाबत आंदोलन केले आणि वीज कंपनीला त्यांच्या मागण्या मान्यही कराव्या लागल्या.
वरकुटे मलवडी ग्रामपंचायतीचे कर्मचारी बाबासाहेब मंडले यांनी वाढीव वीज बिलास कंटाळून गावातील काही तरुणांसमवेत दहिवडी, ता. माण येथील वीजवितरण कंपनीच्या दारातच उपोषण सुरू केले होते. गावात कायमस्वरूपी वायरमन मिळावा, बिले वाढून येणार नाहीत याची खबरदार घ्यावी, वीजबिले कमी करण्यासाठी दहिवडीला अनेक हेलपाटे मारावे लागतात ते थांबवावेत, आदी मागण्यांसाठी हे उपोषण सुरू करण्यात आले होते.
वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी उपोषण मागे घेण्यास लावले. त्यांनी कायमस्वरूपी वायरमन देणे, वीजबिल कमी करणे मागण्या मान्य केल्या आहेत. यावेळी किरण जाधव, नवनाथ मिसाळ, पवन बनसोडे, दत्ता चव्हाण, बंडू मंडले, भलेराव खरात, स्कायलाईन दूध डेअरीचे सुभाष जगताप, सुमन आटपाडकर आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
खरे काम कोणाचे...
वरकुटे मलवडी हे गाव राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण आहे. तालुक्यातील व जिल्ह्यातीलही अनेक राजकीय पदे या गावात आहेत. मात्र, गटातटामुळे गावाचा विकास हा झालेला नाही, याची जाहीर कबुली ग्रामस्थ देत आहेत. मागील काही वर्षांपासूून आरोग्य उपकेंद्रात डॉक्टर नाही. हा दवाखानाही सोसायटीच्या गोदामात आहे. तसेच तलाठी कार्यालय चक्क पशुवैद्यकीय दवाखान्याच्या एका खोलीत आहे. ग्रामपंचायत कार्यालयही भाड्याच्या खोलीत आहे. गावात वायरमन मुक्कामी नसतात. याबद्दल अनेकवेळा ग्रामसभेतही तक्रारी झाल्या होत्या. पण, त्याकडे लक्ष दिले नाही.