अभियंत्यावर कोयता, तलवारीने जीवघेणा हल्ला, जुन्या भांडणातून कृत्य

By दत्ता यादव | Published: July 31, 2023 07:53 PM2023-07-31T19:53:14+5:302023-07-31T19:53:34+5:30

पोलिसांकडून तिघांना अटक

Fatal attack on engineer with Koyta, sword | अभियंत्यावर कोयता, तलवारीने जीवघेणा हल्ला, जुन्या भांडणातून कृत्य

अभियंत्यावर कोयता, तलवारीने जीवघेणा हल्ला, जुन्या भांडणातून कृत्य

googlenewsNext

सातारा : पुण्यात एका कंपनीमध्ये अभियंता असलेल्या तरुणावर पाच जणांनी कोयता आणि तलवारीने जीवघेणा हल्ला केला. त्याला कारमधून ओढत बाहेर काढून बेदम मारहाणही करण्यात आली. जुन्या भांडणातून हा प्रकार घडला असल्याचे समोर येत आहे. ही धक्कादायक घटना रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता यवतेश्वरजवळील घाटाई मंदिर परिसरात घडली.

समर्थ अनिल लेंभे-पाटील, शुभम राक्षे, सोन्या कांबळे (रा. करंजे पेठ, सातारा) यांच्यासह अन्य दोन अनोळखींवर सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वैभव प्रकाश गायकवाड (वय ३६, रा. बदामी विहिरीजवळ, गडकरआळी, सातारा) हा पुण्यातील एका कंपनीमध्ये अभियंता म्हणून काम करतो. सुटीसाठी तो शनिवारी साताऱ्यात आला आहे. रविवारी तो कारमधून मित्रासमवेत कासला फिरायला गेला होता. त्यावेळी ज्याच्यासोबत पूर्वी त्याची भांडणे झाली होती. त्यातील एका तरुणाने त्याला कासला जाताना पाहिले होते. दरम्यान, वैभव गायकवाड आणि त्याचा मित्र कासवरून कारमधून सायंकाळी घरी यायला निघाले. त्यावेळी घाटाई मंदिर परिसरात संशयित पाच जणांनी त्याच्या कारला गाडी आडवी मारून कार थांबवली.

वैभव गायकवाड याला कारमधून बाहेर ओढत समर्थ लेंभे याने कोयत्याने त्याच्यावर हल्ला केला. तर सोन्या कांबळे याने हातातील तलवारीने त्याच्या डोक्यात वार केले. इतर तिघांनी लोखंडी राॅड, सळईने त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. त्यानंतर हल्लेखोर तेथून पसार झाले. जखमी वैभव गायकवाड याला तातडीने साताऱ्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून, त्याच्या डोक्याला नऊ टाके पडले आहेत. पोलिसांनी रुग्णालयात जाऊन वैभव गायकवाडचा जबाब घेतल्यानंतर सातारा तालुका पोलिसांनी पाच जणांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने तिघांनाही अटकही केली. अद्याप यातील दोघेजण फरार आहेत. पोलिस उपनिरीक्षक दळवी हे अधिक तपास करीत आहेत.


पर्यटकांनी व्हिडीओ शूटिंगही केलं

वैभव गायकवाड याच्यावर हल्ला होताना काही पर्यटक व्हिडीओ शूटिंग करत होते. हा प्रकार हल्लेखोरांच्या लक्षात येताच त्यांनी पर्यटकांचे मोबाइलही हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. या घटनेचे शूटिंग पोलिसांना पुरावा म्हणून देण्यात आला आहे.

Web Title: Fatal attack on engineer with Koyta, sword

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.