वकिलावर कोयत्याने वार, जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी; साताऱ्यात वाढे येथील घटना
By दत्ता यादव | Published: April 25, 2023 03:41 PM2023-04-25T15:41:34+5:302023-04-25T15:44:43+5:30
खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल
सातारा : उसाच्या पिकाला दिलेले पाणी पाहण्यासाठी गेलेल्या वकिलावर एकाने कोयत्याने वार केले. यामध्ये संबंधित वकील गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना दि. २३ रोजी सकाळी सात वाजता घडली. याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला आहे.
अमित संपत नलवडे (रा. वाढे, ता. सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सतीश विठ्ठलराव चव्हाण (वय ६२, रा. सदर बझार, सातारा मूळ रा. वाढे, ता. सातारा) हे वकील असून त्यांची वाढे येथे जमीन आहे. त्यांच्या जमिनीमध्ये त्यांनी उसाची लागवड केली आहे. दि. २३ रोजी सकाळी ते उसाला दिलेले पाणी पाहण्यासाठी गेले होते. त्यावेळी अमित नलवडे याने त्यांच्या डोक्यात कोयता मारला.
त्यानंतर दुसरा वार चुकविण्याचा त्यांनी प्रयत्न केला असता तो वार उजव्या गालावर लागला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. या प्रकारानंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री उशिरा त्यांनी पोलिसांना जबाब दिल्यानंतर अमित नलवडे याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला. हा वाद नेमका कोणत्या कारणातून झाला, हे अद्याप पुढे आले नाही. सातारा तालुका पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून, पोलिस निरीक्षक विश्वजित घोडके हे अधिक तपास करीत आहेत.