ज्वालाग्राही पदार्थांच्या वाहनातून जीवघेणा प्रवास

By admin | Published: March 28, 2017 02:50 PM2017-03-28T14:50:40+5:302017-03-28T14:50:40+5:30

खंडाळ्यातील चित्र : पुणे-बेंगलोर महामार्गावर धोक्याची घंटा; ठोस उपाययोजनेची गरज

Fatal travel through combustible materials vehicles | ज्वालाग्राही पदार्थांच्या वाहनातून जीवघेणा प्रवास

ज्वालाग्राही पदार्थांच्या वाहनातून जीवघेणा प्रवास

Next

आॅनलाईन लोकमत


खंडाळा : पुणे सातारा राष्ट्रीय महामार्गावरील खंडाळा येथील बसस्थानकात लांब पल्ऱ्याच्या एसटी बस थांबत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे . महामार्गावरच अनेक प्रवाशी वाहनांची प्रतीक्षा करत उभे राहतात. त्यामुळे भरधाव वेगाच्या वाहनांचा धोका पत्करून प्रवाशांना जीव मुठीत धरुन एसटी बसची वाट पहावी लागते. बसअभावी अनेकदा धोकादायक वाहनातूनही प्रवास करण्याचे धाडस प्रवाशी करत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे.


खंडाळा येथील बसस्थानक हे महामार्गावरील उड्डाणपूलाच्या शेजारीच आहे . स्थानिक गावांना जाणाऱ्या बसेस तसेच वाई, महाबळेश्वर, सातारा या ठिकाणी जाणाऱ्याच गाड्या बसस्थानकात येतात. त्यामुळे पुणे, मुंबई, नाशिक, कऱ्हाड, कोल्हापूर, सांगली यासारख्या इतर शहारात जाणाऱ्या प्रवाशांना हायवेवरच एसटीसाठी उभे रहावे लागते. विशेषत: सकाळी आणि सायंकाळी महामार्गावर मोठी गर्दी पहायला मिळते. एसटी बस येथेही हात दाखवूनच थांबवावी लागते त्यासाठी अनेकदा प्रवाशी रस्त्यावरच उभे असतात. त्यामुळे भरधाव वेगाने येणाऱ्या इतर वाहनांचा धोका संभवतो. उड्डाण पूलाच्या बाजूलाच अनेक प्रवासी उभे राहत असल्याने खंडाळा शहरात येणाऱ्या वाहनांनाही अडचण निर्माण होते. मात्र, याकडे महामार्गा प्राधिकरण व पोलिस प्रशासनाचेही दुर्लक्ष आहे.


महामार्गावरही एसटी बस न मिळाल्यास रॉकेल, डिझेल, एलपीजी गॅस, रासायनिक द्रव्ये, घरगुती गॅस सिलिंडर असे ज्वालाग्राही पदार्थांची वाहतूक करणाऱ्या गाड्यातूनही प्रवास केला जातो. त्यामुळे प्रवाशांच्या जीवितास मोठा धोका आहे. धोकादायक वाहनातून हा प्रवास दिवसाढवळ्या राजरोसपणे सुरू असतो, मात्र याकडेही डोळेझाक केली जाते .
महामार्गावरून जाणाऱ्या विना वाहक एसटी बस सोडून इतर सर्व बसेस खंडाळा बसस्थानकात आल्यास हायवेवर उभे राहण्याचे प्रमाण कमी येईल मात्र यासाठी एसटी महामंडळाकडून प्रयत्न होणे गरजेचे आहे .(प्रतिनिधी)

अनेकांना गमवावा लागलाय जीव !


खंडाळा येथे महामार्गावर उभ्या असलेल्या प्रवाशांच्या अपघाताच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. दोन वषार्पूर्वी भरधाव वेगाने आलेल्या कंटेनरने आठ प्रवाशांना जागीच चिरडले होते. त्यावेळी हायवेकडेला उभ्या राहणाऱ्या प्रवाशांना बंदी करण्यात आली होती. मात्र ती घटना ताजी असतानाही पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे.

खंडाळा येथील महामार्गावर प्रवाशांची होणारी अडचण दूर व्हावी यासाठी स्थानिक पातळीवरून अनेकदा मागणी झाली आहे. सर्व बसेस स्थानकात याव्यात यासाठी नगरपंचायतीच्या वतीने ही मागणी करणार आहे.
- शरदकुमार दोशी, नगराध्यक्ष
 

Web Title: Fatal travel through combustible materials vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.