Satara: दत्तक देण्यावरून वाद, बापानेच दोन महिन्यांच्या मुलाची विष पाजून हत्या केली; न्यायालयाने जन्मठेप सुनावली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 14:10 IST2025-03-26T14:10:29+5:302025-03-26T14:10:46+5:30
वडूज : दत्तक देण्याच्या कारणावरून मुलगा वेदांत (वय दोन महिने) याची विषारी औषध पाजून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी ...

Satara: दत्तक देण्यावरून वाद, बापानेच दोन महिन्यांच्या मुलाची विष पाजून हत्या केली; न्यायालयाने जन्मठेप सुनावली
वडूज : दत्तक देण्याच्या कारणावरून मुलगा वेदांत (वय दोन महिने) याची विषारी औषध पाजून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी दहिवडी न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. रणजीत सुरेश बुलूंगे (वय ३३ रा. सुरूर, ता. वाई) असे जन्मठेप झालेल्या बापाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रणजीत सुरेश बुलूंगे याने २० जानेवारी २०१८ रोजी त्याचा मुलगा वेदांत यास दत्तक देण्याबाबत पत्नीच्या माहेरकडील लोकांना म्हणत होता. परंतु त्यांनी त्यास दत्तक देण्यास विरोध केला. यामुळे त्याने २० जानेवारी २०१८ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास मुलाचे टॉनिकचे बाटलीत विषारी औषध मिसळून पाजले. यामध्ये वेदांतला त्रास होऊ लागला. यास उपचाराकरिता जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, मात्र त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.
मुलगा वेदांत याचा विषारी औषध पाजून खून केल्याप्रकरणी रणजीत सुरेश बुलूंगे याच्या विरोधात दहिवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात पोलिस निरीक्षक प्रवीण पाटील यांनी साक्षीदारांचे जाब-जबाब नोंदवले. तसेच वैद्यकीय पुरावे जमा केले. कसून तपास करून आरोपींविरुद्ध वडूजच्या जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. वडूज येथील जिल्हा सत्र न्यायालयात या कामी सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी वकील वैभव हरीश काटकर यांनी काम पाहिले. यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने अकरा साक्षीदार तपासण्यात आले.
साक्षीदारांचे जाब-जबाब, कागदोपत्री पुरावा, वैद्यकीय पुरावा व सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. व्ही. हुद्दार यांनी आरोपीला दोषी ठरवून रणजीत सुरेश बुलूंगे याला जन्मठेप व दहा हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली.
हा खटला चालवणे कामी उपविभागीय पोलिस अधिकारी अश्विनी शेंडगे, सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी मार्गदर्शन केले. तसेच प्रॉसिक्युशन स्क्वाडचे पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय जाधव, महिला पोलिस हवालदार विजयालक्ष्मी दडस, पोलिस कॉन्स्टेबल सागर सजगणे, पोलिस कॉन्स्टेबल जयवंत शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल अमीर शिकलगार यांनी सहकार्य केले.