बनावट मुखत्यारपत्र केल्याप्रकरणी वडील, मुलावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 11:54 AM2020-01-21T11:54:59+5:302020-01-21T11:56:38+5:30
बनावट मुखत्यारपत्र तयार करून सातबाऱ्यावर नोंद केल्याप्रकरणी वडिलांसह थोरल्या मुलावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी धाकट्या भावाने तक्रार दिली आहे.
सातारा : बनावट मुखत्यारपत्र तयार करून सातबाऱ्यावर नोंद केल्याप्रकरणी वडिलांसह थोरल्या मुलावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी धाकट्या भावाने तक्रार दिली आहे.
मुलगा किशोर पांडुरंग सारडा, वडील पांडुरंग नारायण सारडा (रा. शनिवार पेठ, सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आजोबा नारायणदास शिवनाथ सारडा यांच्या इच्छापत्रानुसार मृत्यूनंतर त्यांच्या नावावर असलेली मिळकत धाकटा भाऊ मुकेश पांडुरंग सारडा (रा. भोपाळ, मध्यप्रदेश) यांच्या नावावर करण्यात आली होती.
मात्र, थोरला भाऊ किशोर आणि वडील पांडुरंग सारडा यांनी संगनमत करून मुकेश सारडा यांच्या नावाचे बनावट मुखत्यारपत्र तयार केले. त्यावर मुकेश यांच्या खोट्या सह्या केल्या. त्यानंतर न्यायालयात कोर्टाची दिशाभूल करून निकालाचा वापर केला.
सातबाऱ्यावर मुकेश सारडा यांच्या नावाची नोंद कमी करून त्यावर पांडुरंग सारडांनी स्वत:च्या नावाची नोंद केली. हा प्रकार समोर आल्यानंतर धाकटा भाऊ मुकेश सारडा यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
त्यांच्या तक्रारीवरून कलम ४७१ (खोटा दस्ताऐवज तयार करून वापरणे) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक ढेकळे हे अधिक तपास करत आहेत.