घड्याळावरून ओळखला वडिलांचा मृतदेह

By Admin | Published: October 27, 2016 11:21 PM2016-10-27T23:21:21+5:302016-10-27T23:21:21+5:30

झेडपी जळीतकांड : पप्पा दरवाजातून बाहेर का आले नाहीत?; अविष्कारचा टाहो...

Father's body known to the clock | घड्याळावरून ओळखला वडिलांचा मृतदेह

घड्याळावरून ओळखला वडिलांचा मृतदेह

googlenewsNext

 सातारा : जिल्हा परिषदेसमोरील लोकल बोर्डच्या इमारतीमध्ये आगीत होरपळून मृत्यू झालेल्या उपअभियंता निवृत्ती गांगुर्डे यांच्या मुलाने वडिलांच्या मृत्यूविषयी शंका उपस्थित केली असून, ही भीषण आग लागली त्यावेळी माझ्या पप्पांनी दरवाजातून बाहेर येण्याचा प्रयत्न का केला नाही? असा प्रश्न गांगुर्डे यांचा मुलगा अविष्कार याने पोलिसांना विचारला आहे.
उपअभियंता निवृत्त गांगुर्डे यांची गेल्या काही महिन्यांपूर्वीच पुण्याहून साताऱ्यात बदली झाली होती. त्यामुळे त्यांची जिल्हा परिषदेमध्ये कोणाशी ओळखही नव्हती. ते शासकीय निवासस्थानी एकटेच राहत होते. ही घटना घडण्यापूर्वी ते संध्याकाळी सात वाजता पत्नी आणि मुलाशी मोबाईलवर बोलले. ‘मी दिवाळीसाठी उद्या घरी येतोय,’ असे गांगुर्डे यांनी त्यांना सांगितले होते. मात्र, नियतीला हे मान्य नसावे, दिवाळी सणाला घरी जाण्यापूर्वीच गांगुर्डे यांच्यावर काळाने घाला घातला. केबीनमध्ये शॉर्टसर्किट झाल्यामुळे त्यांचा होरपळून मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे. या घटनेनंतर पोलिसांनी नाशिक येथे राहणाऱ्या गांगुर्डे यांच्या पत्नी आणि मुलाशी संपर्क साधून सर्व हकिकत सांगितली. त्यानंतर गांगुर्डे यांची पत्नी, मुलगा, भाऊ व अन्य नातेवाईक साताऱ्यात आले. ज्या ठिकाणी घटना घडली, ते ठिकाण पोलिसांनी नातेवाइकांना दाखविले. यावेळी गांगुर्डे यांचा मुलगा अविष्कार याला वडिलांच्या केबीनची झालेली अवस्था पाहून प्रश्न पडला. ‘आग लागल्यानंतर पप्पांना लगेच बाहेर का पडता आले नाही. शेजारी खिडकी पण आहे, कोणाला तरी आवाज देता आला असता,’ असे अनेक प्रश्न त्याने उपस्थित केले आहेत. मात्र, गांगुर्डे परिवारावर दु:खचा डोंगर कोसळल्याने पोलिसांनी त्यांचा जबाब अथवा फारशी चौकशी केली नाही. गांगुर्डे यांचा मृतदेह पहाटे पुणे येथे नेण्यात आला. या ठिकाणी त्यांच्यावर अत्यंसंस्कार करण्यात आले. (प्रतिनिधी)

घड्याळावरून ओळखला मृतदेह!
उपअभियंता निवृत्ती गांगुर्डे यांचा मृतदेह पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत होता. त्यामुळे हा मृतदेह नेमका त्यांचाच आहे का? अशी शंकाही त्यांच्या कुटुंबीयांनी सुरुवातीला घेतली होती; परंतु हातात असलेल्या घड्याळावरून अखेर गांगुर्डे यांचा मृतदेह त्यांच्या मुलाने ओळखला. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह त्यांच्या ताब्यात दिला.
 

Web Title: Father's body known to the clock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.