पित्याचा अनर्थ तरीही माणुसकीचा ‘अर्थ’!

By admin | Published: December 7, 2015 10:20 PM2015-12-07T22:20:36+5:302015-12-08T00:34:39+5:30

बोरगावातील अथर्वला मदत : व्हॉटस्अ‍ॅप गु्रप, सामाजिक संस्थाकडून हात; दीड लाख रुपये सुपुर्द

Father's Wisdom Still Human 'Meaning'! | पित्याचा अनर्थ तरीही माणुसकीचा ‘अर्थ’!

पित्याचा अनर्थ तरीही माणुसकीचा ‘अर्थ’!

Next

पांडुरंग भिलारे-- वाई बोरगाव, ता़ वाई येथे घरगुती वादातून पत्नीचा निघृण खून करून मुलास जखमी केले व स्वत: ही जीवन यात्रा संपविली. या घटनेने फक्त वाडकर कुटुंबच नव्हे तर सर्व समाजमनाला हेलावून सोडलं गेलं. जखमी असणाऱ्या अथर्ववर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यावेळी त्याच्या व कुटुंबाच्या मदतीला व्हॉटसअ‍ॅप ग्रुप आणि सामाजिक संस्था धावल्या. आवाहनानंतर एक लाख ६० हजारांची रक्कम जमा झाली. त्यातच आमदार मकरंद पाटील यांनीही दोन्ही मुलांची भविष्यातील जबाबदारी उचलण्याची तयारी दर्शविली आहे. बोरगाव येथील विजय वाडकर व त्याची पत्नी सारिका हे आपल्या मुलांसह कोपरखैराणे (नवी मुंबई) येथे एक वर्षापूर्वी राहण्यासाठी गेले होते़ पत्नी सारिका ही एका खासगी कंपनीत कामाला जात होती़ ही बाब विजयला आवडत नसल्याने त्यांच्यात वारंवार भांडणे होत होती.
मुलगा अथर्व याला गावी राहण्यास आवडत होते़ दरम्यान, त्यांच्यात कौटुंबिक वादावादी विकोपाला गेली. त्यातूनच गावी बोरगावला विजयने पत्नी सारिकाचा खून केला, मुलावर हल्ला केला. त्यानंतर स्वत:ही गळा चिरून आत्महत्या केली. जखमी अथर्ववर सध्या वाई येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना घडल्यानंतर वाईचा पश्चिम भाग हादरून गेला होता. तालुक्यात खळबळ माजली होती.
वाडकर कुटुंबात विजय हा एकमेव कमवणारा होता. वडिलांचाही मृत्यू झाला आहे. आता या कुटुंबात आठवीमध्ये शिकणारी श्रृतिका, वयोवृध्द आजी व जखमी अथर्व असे कुटुंब राहिले आहे. अशा या कुटुंबापुढे एकाएकी नियतीचा दुर्दैवी अंधार पसरला़ अशा या दु:खाच्या प्रसंगी व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपमधूनही सर्वत्र या घटनेविषयी हळहळ व्यक्त केली जाऊ लागली़ मदतीचे आवाहन करण्यात आले. या आवाहनाला प्रतिसाद देत वाईच्या पश्चिम भागातून विविध सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती पुढे आल्या. त्यांनी आघात झालेल्या या कुटुंबाला माणूसकीचा हात दिला़ व्हॉटस्अ‍ॅप गु्रपमध्ये काळेश्वरी चॅरिटेबल ट्रस्ट, आम्ही वयगावकर, पंचक्रोशी ग्रुप, आपली माणसं, सामाजिक संस्थामध्ये जन्नीदेवी कला व क्रीडा मंडळ दह्याट, मावळा प्रतिष्ठान, रोटरी क्लब वाई, बोरगावचे न्यू इंग्लिश स्कूल, बोरगाव ग्रामस्थ मंडळ, पश्चिम भागातील प्राथमिक शिक्षक, तसेच पश्चिम भागातील मुंबईकर नागरिकांनी, नोकरदारांनी वैयक्तिक मदतीचा हात पुढे केला़. जखमी अथर्वच्या उपचारासाठी व भविष्यासाठी एक लाख साठ हजारांची रक्कम जमा केली़ यासाठी व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपच्या माध्यमाचा चांगला उपयोग
झाला़ दरम्यान जखमी अथर्वला पाहण्यासाठी आलेल्या आमदार मकरंद पाटील यांनी दोन्ही मुलांची भविष्यातील महत्त्वपूर्ण जबाबदारी उचलण्याची तयारी दर्शविली आहे. अथर्व उपचार घेत असलेल्या गितांजली हॉस्पिटलचे डॉ. जयघोष कद्दू यांनी सांगितले की ‘अथर्वची प्रकृती आता धोक्याच्या बाहेर आहे. त्याला हॉस्पिटलच्या बिलामध्ये आर्थिक दिलासा देण्यात येईल.’

सोशल मीडियाचे सकारात्मक रूप...
सध्या अनेकांकडून सोशल मीडियाचा दुरूपयोग होत आहे. विविध गैरप्रकार घडतात. त्यामुळे समाजापुढे सोशल मीडियाचे विद्रुप रूप समोर आले होते़ सोशल मीडियाची दुसरी बाजू पाहिली तर काही लोक संघटीत होऊन विधायक कामे करत असल्याचे ही दिसते. याची प्रचिती देत अनेक व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून मदत गोळा केली जात आहे. हे सोशल मीडियाचे समारात्मक रूपच म्हणावे लागेल़

Web Title: Father's Wisdom Still Human 'Meaning'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.