ऑनलाइन नोंदणीमुळे कोरोनाचा प्रसार होण्याची भीती !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:38 AM2021-05-10T04:38:25+5:302021-05-10T04:38:25+5:30
रामापूर : शासनाने अठरा वर्षांवरील नागरिकांसाठी ऑनलाइन नोंदणी करून लस देण्यात येत आहे, असे जाहीर केले आहे. मात्र ...
रामापूर : शासनाने अठरा वर्षांवरील नागरिकांसाठी ऑनलाइन नोंदणी करून लस देण्यात येत आहे, असे जाहीर केले आहे. मात्र सॉफ्टवेअरमधील तांत्रिक चुकीमुळे तालुक्याबाहेरील सातारा, कोरेगाव, कऱ्हाड, महाबळेश्वर येथील नागरिकांना पाटण ग्रामीण रुग्णालयातील केंद्र लस घेण्यासाठी मिळत आहे. तालुक्याबाहेरील नागरिक लस घेण्यासाठी गर्दी करत असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका आहे.
जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत पाटण तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव तसा कमी असे म्हटले पाहिजे. याचे कारण येथील उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे, तहसीलदार योगेश्वर टोम्पे, पोलीस अधिकारी चोखंडे आणि आरोग्य कर्मचारी, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिषेक परदेशी या अधिकारी वर्गाने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून शासनाच्या नियमांची कठोर अंमलबजावणी केल्यानेच तालुक्यात इतर तालुक्यांच्या तुलनेत कोरोना प्रादुर्भाव कमी आहे. मात्र अठरा वर्षांवरील वयोगटातील बाहेरील नागरिक पाटण ग्रामीण रुग्णालयात गर्दी करत आहेत. ही गर्दी प्रशासनाने आतापर्यंत केलेल्या चांगल्या कामावर पाणी टाकू नये अशा प्रतिक्रिया स्थानिक नागरिक व्यक्त करत आहे.
पाटण ग्रामीण रुग्णालयात अठरा ते चाळीस वयोगटातील तालुक्याबाहेरील नागरिकांनी शनिवार आणि रविवारी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. लसीकरणासाठी ऑनलाइन नोंदणी असल्याने तालुक्याबाहेरील सातारा, कऱ्हाड, महाबळेश्वर, कोरेगाव आदी तालुक्यांतील नागरिकांची पाटण रुग्णालयाबाहेर सकाळपासूनच गर्दी केली होती. अठरा वर्षांवरील प्रत्येक नागरिकास आपापल्या तालुक्यातच कोरोनाची लस मिळावी, जेणेकरून कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही, अशा तालुक्यातील नागरिकांच्या प्रतिक्रिया येत आहेत.
प्रादुर्भावाची भीती
लसीकरणासाठी ऑनलाइन नोंदणी असल्याने तालुक्याबाहेरील सातारा, कऱ्हाड, कोरेगाव, महाबळेश्वर नागरिकांना पाटण येथील केंद्र मिळत असल्याने ते लसीकरणासाठी येथील ग्रामीण रुग्णालयाबाहेर गर्दी करत आहेत. त्यामुळे बाहेरून आलेल्या नागरिकांकडून स्थानिक नागरिकांना किंवा ग्रामीण रुग्णालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रत्येक तालुक्यातील नागरिकांना त्याच्या तालुक्याच्या ठिकाणी लस मिळावी, अशी स्थानिकांची मागणी जोर धरत आहे.
फोटो : ०९पाटण-पीएचसी