गावोगावी वीजवितरणच्या ‘झटक्याची’ भीती
By admin | Published: September 1, 2015 08:15 PM2015-09-01T20:15:04+5:302015-09-01T20:15:04+5:30
अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : गंजलेले खांब अन् लोंबकळणाऱ्या तारा झाडा-वेलींच्या विळख्यात
कऱ्हाड : कऱ्हाड तालुक्यातील अनेक गावांत विद्युत खांब आणि वीजवाहिन्यांची दुरवस्था झाली आहे. अनेक गावांतील हे खांब गंजले असून विद्युत वाहिन्या लोंबकळत असल्याने धोकादायक बनल्या आहेत. परिणामी लोकांना जीवन असुरक्षित वाटत असून झिरमिर पावसात या गंजलेल्या खांबांपासून व लोंबकळणाऱ्या तारांपासून धोका निर्माण झाला आहे.
प्रत्येक महिन्याला वीजबील देणाऱ्या ग्रामिण भागातील ग्राहकाला मात्र, वीजवितरण कंपनीकडून अपुऱ्या सुविधाच दिल्या जात आहेत. तात्पूरत्या उपाय योजना करत ग्राहकांना तात्पूरता दिलासा देणाऱ्या वीज वितरणच्या कामाकाजाबाबत सर्वसामान्य कायमस्वरूपी नाराजीच व्यक्त करतो. वेळोवेळी वाढीव बिले देणाऱ्या वीजवितरणकडून गंजलेले पोल व लोंबकळणाऱ्या तारांक डे दुर्लक्ष केले जात आहे.
तालुक्यात उच्चदाबाचे तसेच लघू दाबाचे खांब वीजवितरण कंपनीकडून बसविण्यात आले आहेत. चाळीस ते पन्नास वर्षापूर्वी बसविण्यात आलेल्या खांबांना आता गंज चढला आहे. तर काही ठिकाणी खांब हे मोडकळीस पडले असून वाहिन्याही लोंबकळत पडलेल्या दिसून येत आहेत. त्यापासून ग्रामिण भागातील लोकांना, शाळेतील मुलांना तसेच वयोवृद्धांना धोका पोहचत आहे.
गंजलेल्या खांबाना व लोंबकळणाऱ्या वीजवाहक वाहिन्यांना बदलण्याबाबत अनेकदा पंचायत समितीच्या मासिक सभेवेळी सदस्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले आहे. वेळोवेळी अधिकाऱ्यांकडे मागणी करूनही त्यांच्याकडून थातूर-मातूर उत्तरे देत विषयाकडे दुर्लक्ष केले जात आहे. सभापतींसह गटविकास अधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत वीजवितरण अधिकाऱ्यांकडून नुसती आश्वासनेच दिली जात आहेत.
विजवितरणच्या कारभाराबाबत ग्राहकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. अनेक वेळा मासिक सभांमधून विजवितरणच्या अधिकाऱ्यांची कानउघडणी करून देखील त्यांच्याकडून किती कार्यवाही केली जाते. ३० ते ३५ वर्षापूर्वी बसविण्यात आलेले पोल डांबावरील विद्यूत तारा तसेच ट्रान्सफॉर्मर हे आता गंजून गेले आहेत. शिवाय जीर्ण झालेले विद्युत खांबही तुटून पडण्याची भिती निर्माण झाली आहे. नवीन विद्युत तारांचा वापर करण्याची गरज असताना पुन्हा पुन्हा तात्पूरत्या स्वरूपात विद्युत तारांची डागडूजी केली जाते. ग्रामिण भागात पावसाळ्यात अनेकवेळा विज जावून अंधाराची परिस्थिती निर्माण होत असते. विद्युत तारा तुटने, शॉर्ट सर्किट होणे असे प्रकार अनेकवेळा घडतात.
तारांच्या तुटण्याने शॉक लागून जनावरांचा मृत्यु झाल्याच्या घटना तालुक्यात अनेकदा घडलेल्या आहेत. त्याची भरपाई देखील वीजवितरण कंपनीकडून दिली जाते का? येणके, पोतले, विंग परिसरात असलेल्या ट्रान्सफॉर्मर व विद्युतखांबांना मोठ्या प्रमाणात झाडवेलींचा विळखा पडला आहे. पावसाळ्यात या भागात अनेकवेळा वीज जाण्याचे प्रसंगही घडत आहेत. त्यामुळे विजवितरण कंपनीकडून या भागासह तालुक्यातील अनेक गावांत तसेच परिसरात असलेल्या धोकादायक विद्युत खांब व गंजलेले लोखंडी, उघडे डीपी पेट्या दुरूस्त अथवा बदलने गरजेचे आहे. (प्रतिनिधी)
हे होत नाही !
पावासाळापुर्वी कर्मचाऱ्यांनीसंपूर्ण भागाचे लाइन पेट्रोलिंग करणे गरजेचे आहे.
उघडे असलेले डीपी बॉक्स बंद करणे
जंप बदलणे, वीज तारांवरील पावडर काढणे
इन्सुलेटर बदलने
जमिनीपासून उंचीवर विजवाहक तारा ओढणे
गंजलेले ट्रान्सफॉर्मर अन् वाकलेले खांब
तालुक्यातील कोपर्डे हवेली, कार्वे, कोडोली, कोरेगाव, किरपे, येणके, पोतले, पाटीलमळा, विंग, चचेगाव, धोंडेवाडी, काले, उंडाळे परिसरात अनेक ठिकाणी गंजलेले, उघडे असलेले ट्रान्सफॉर्मर व वाकलेले खांब असून त्यांची डागडुजी करणे गरजेचे आहे.
उघड्या डीपी बॉक्समधून विद्युतप्रवाह
ग्रामीण भागात ३० ते ३५ वर्षापुर्वी बसविण्यात आलेल्या डीपी बॉक्सची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. या बॉक्सला गंज चढला असून त्याचे दरवाजेही मोडून पडले आहेत. पावसाळ्यात अनेकवेळा या उघड्या डीपी बॉक्समधून विजेच्या ठिणग्या बाहेर येत असतात. मोठ्या प्रमाणात यामधून विद्युत प्रवाह वाहत असल्याने हे लहान मुलांच्या जीवास धोका देणारे ठरत आहेत.