हृदयद्रावक! आईच्या निधनानंतर चिमुकलीने घेतली कुटुंबाची जबाबदारी, पण मद्यपी वडिलांच्या त्रासाला कंटाळून संपवले जीवन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2022 05:24 PM2022-05-02T17:24:00+5:302022-05-02T17:24:27+5:30
वडिलांच्या त्रासाला कंटाळली. त्यामुळे तिने यातून सुटका व्हावी म्हणून विहिरीत उडी टाकून आपले आयुष्य संपविले.
सातारा : आईच्या निधनानंतर लहान वयातच १५ वर्षांच्या मुलीने कुटुंबाची जबाबदारी स्वत:च्या अंगावर घेतली. मात्र, वडील सतत दारू पिऊन तरर्र असल्याने मुलगी वडिलांच्या त्रासाला कंटाळली. त्यामुळे तिने यातून सुटका व्हावी म्हणून विहिरीत उडी टाकून आपले आयुष्य संपविले. मानसी संतोष डाडर (वय १५, मूळ रा. नागलवाडी, ता. कर्जत, जि. अहमदनगर, सध्या रा. आंबेवाडी, ता. सातारा) असे या मृत मुलीचे नाव आहे. ही हृदयद्रावक घटना सातारा तालुक्यातील आंबेवाडी येथे घडलीय.
याबाबत बोरगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मानसीचे वडील संतोष डाडर हे ऊसतोड मजूर असून, आंबेवाडी येथील शेतामध्ये पाल टाकून वास्तव्य करत आहेत. त्यांच्या पत्नीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. त्यांना मानसी आणि १३ वर्षांचा मुलगा आहे. पत्नीचे निधन झाल्यानंतर चिमुकल्या मानसीने वडील आणि भावाची जबाबदारी स्वत:च्या शिरावर घेतली. या दोघांना जेवण करून घालणे, स्वत: ऊसतोडीला जाणे, असा तिचा दिनक्रम असायचा.
मात्र, दररोज तिचे वडील संतोष डाडर हे घरामध्ये दारू पिऊन यायचे. त्यामुळे तिला ते सहन होत नव्हतं. त्यातच आर्थिक ओढाताण व्हायची. या साऱ्या प्रकाराला ती कंटाळली होती. यातून आपली सुटका व्हावी म्हणून तिने टोकाचा निर्णय घेतला. आंबेवाडी येथील मसवटा नावाच्या शिवारातील विहिरीमध्ये तिने दुपारच्या सुमारास उडी टाकून आत्महत्या केली.
हा प्रकार समोर आल्यानंतर याची माहिती बोरगाव पोलिसांना देण्यात आली. या घटनेचे गांभीर्य ओळखून बोरगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. त्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.
संसारोपयोगी साहित्य ठेवून वडील गेले गावी..
एकुलत्या एक मुलीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी वडील संतोष डाडर यांच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे याची जबाबदारी ते ज्या कारखान्याकडे काम करत होते. त्या कारखान्याने खर्चाची जबाबदारी पेलली. त्यांच्या मुलीचा मृतदेह रुग्णवाहिकने त्यांच्या मूळ गावी नेण्यात आला. जाताना त्यांनी संसारोपयोगी साहित्य त्यांच्या पालवजा घरामध्ये ठेवले आहे. आता ते परत इकडे येतील की नाही, याची शाश्वती नाही, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.