जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर खत..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:41 AM2021-05-21T04:41:31+5:302021-05-21T04:41:31+5:30
सातारा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने नावीण्यपूर्ण पाऊल उचलले असून, जिल्ह्यातील बळीराजाला यावर्षीच्या खरीप हंगामातही बांधावरच खते पुरविण्यात येणार ...
सातारा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने नावीण्यपूर्ण पाऊल उचलले असून, जिल्ह्यातील बळीराजाला यावर्षीच्या खरीप हंगामातही बांधावरच खते पुरविण्यात येणार आहेत. याची सुरुवातही जिल्ह्यातील काही तालुक्यांत झाली आहे. यासाठी शेतकरी गटांना मागणी करून नोंदणी करावी लागत आहे. बाजारातील गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात खरीप हंगाम घेण्यात येतो. सर्व ११ तालुक्यांत मिळून सर्वसाधरणपणे खरिपाचे क्षेत्र हे साडेतीन लाख हेक्टरहून अधिक असते. यामध्ये सर्वाधिक क्षेत्रावर सोयाबीन घेण्यात येते. याचे सर्वसाधारण क्षेत्र ६० हजार हेक्टरवर असते. याच्या खालोखाल भाताचे अंदाजे ५० हजार, बाजरी ५० हजारांवर आणि भुईमुगाचे ४० हजार हेक्टरच्या आसपास असते. जिल्ह्यात सध्या खरीप हंगामाच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी तयारी सुरू केली आहे. त्याचबरोबर कृषी विभागाने खते आणि बियाण्यांची मागणी केली आहे. काही प्रमाणात खत आणि बियाणेही उपलब्ध झालेले आहे. मान्सूनचा पाऊस जिल्ह्यात लवकरच दाखल होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगाम पेरणीची तयारी सुरू केली आहे.
कृषी विभागाचे खत आणि बियाणांचे नियोजन झाले आहे. गेल्यावर्षी शेतकऱ्यांना बांधावर खते देण्यात आली होती. आताही त्याचपद्धतीने खते पोहोच करण्यात येत आहेत. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर खत आणि बियाणे पुरवठा सुरळीत व्हावा हा यामागे हेतू आहे. त्यासाठी गावांतील शेतकऱ्यांच्या गटांनी खते आणि बियाण्यांची नोंदणी करावयाची आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना खत बांध, गावांत उपलब्ध करून दिले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बाजारपेठेपर्यंत किंवा शहरात ये-जा करावी लागत नाही. अनावश्यक गर्दी होत नाही. त्याचबरोबर शेतकऱ्यांचा वैयक्तिक खर्चही वाचेल, अशी कारणेही या पाठीमागे आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आता शहरापर्यंत ये-जा करावी लागणार नाही व वेळही वाचणार आहे.
सद्यस्थितीत जिल्ह्याच्या पश्चिम भागातील तालुक्यात बांध व गावांत खते पोहोच केली जात आहेत. कारण, पश्चिमेकडे पाऊस लवकर होत असल्याने शेतकऱ्यांची खत मागणी आहे. लवकरच मागणीप्रमाणे इतर तालुक्यातही खते पोहोच केली जाणार आहेत.
कोट :
जिल्ह्यातील खरीप हंगामासाठी खते आणि बियाणांचे नियोजन कृषी विभागाने पूर्णपणे केले आहे. पावसाळा जवळ आला असून, शेतकरी गटाने मागणी केल्यानंतर बांध आणि गावांत खते देण्यात येत आहेत. खरीप हंगामात शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही, असे नियोजन झालेले आहे.
- गुरुदत्त काळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सातारा
फोटो दि.२०सातारा अॅग्री फोटो...
फोटो ओळ : सातारा जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या मागणीनुसार बांधावर तसेच गावांत खत पोहोच करण्यात येऊ लागले आहे.
....................................................