सेंद्रिय उत्पादनांच्या वाढीला मिळतेय खतपाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:23 AM2021-07-23T04:23:21+5:302021-07-23T04:23:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क खंडाळा : कोरोना काळात अन्न, आहाराबाबत नागरिकांमध्ये जागरुकता वाढलेली आहे. या आजाराशी सामना करण्यासाठी रोगप्रतिकारकशक्ती ...
लोकमत न्यूज नेटवर्क
खंडाळा : कोरोना काळात अन्न, आहाराबाबत नागरिकांमध्ये जागरुकता वाढलेली आहे. या आजाराशी सामना करण्यासाठी रोगप्रतिकारकशक्ती वाढविणे गरजेचे आहे. गेल्या दोन वर्षात सकस आहार घेण्याला लोकांनी प्राधान्य दिले आहे. त्यामुळे कोरोना काळात सेंद्रिय उत्पादनांच्या वाढीला खतपाणी मिळत आहे.
कोरोनासारख्या महामारीने अवघ्या जगाला हादरवले आहे. कोरोना आजाराला बळी पडण्यापेक्षा तब्बेत चांगली राखण्याकडे सर्वांचा कल वाढला आहे. त्यासाठी रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेदिक काढा, चौरस आहार, व्यायाम, प्राणायाम या गोष्टींकडे प्रत्येकाने लक्ष दिले आहे. चौकस आहार घेताना भाजीपाला, फळभाज्या, फळे निवडताना सेंद्रिय पध्दतीने उत्पादित केलेल्या पिकांची आवर्जून निवड केली जात आहे. त्यामुळे बाजारातील सेंद्रिय व्यापारी वृत्तीला खतपाणी मिळाले आहे.
अचानक वाढलेल्या मागणीमुळे सेंद्रिय शेती क्षेत्रात व निर्यातीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सातारा जिल्ह्यात आरोग्याबाबत जशी जागरूकता निर्माण झाली आहे, तशीच ती सर्व स्तरावर झाली आहे. यात पोषक अन्न घेण्याकडे नागरिकांचा कल वाढत आहे. त्याचाच परिणाम म्हणून सेंद्रिय अन्नपदार्थांना मागणी वाढली आहे. विशेषतः शहरी भागासह ग्रामीण भागातही सेंद्रिय उत्पादनांना मोठी मागणी आहे. त्यामुळे सेंद्रिय उत्पादनांच्या उलाढालीत वाढ झाली आहे. कृषी व प्रक्रियायुक्त उत्पादने वाढल्याने सेंद्रिय उत्पादनांसाठी पोषक वातावरण तयार होत आहे.
(चौकट)
भाजीपाल्याकडे लक्ष
आहारात मेथी, गवार, वांगी, बटाटा, शेपू, पालक, तांदुळजा, डेसा, मिरची यासह अन्य भाजीपाला कोणतेही रासायनिक खते व औषधे यांचा वापर न करता पिकवून तो वापरणे किंवा सेंद्रिय शेती फार्मवर जाऊन विकत घेणे, याकडे सर्वांचा कल वाढला आहे. याशिवाय केळी, पपई, पेरू, आंबा ही फळे सेंद्रिय पध्दतीने पिकवली असल्यास त्याला जादा दर देऊन विकत घेण्याचे प्रमाण वाढले आहे. आहारात दूध व दुधाचे पदार्थ मोठ्या प्रमाणात वापरले जात आहेत.
(कोट)
जिल्ह्यातील एकूण शेती क्षेत्राचा विचार केल्यास सेंद्रिय शेतीचे प्रमाण कमी आहे. त्यात वृद्धी झाल्यास सेंद्रिय उत्पादनांच्या बाजारात त्याचा दबदबा निर्माण होऊ शकतो. वाढते ग्राहक ही सकारात्मक बाब आहे. शेतकऱ्यांनी सेंद्रिय पिकांच्या उत्पादनावर भर दिला पाहिजे. त्यातून कमी जागेत व अल्प खर्चात चांगले उत्पन्न मिळू शकते.
- दत्तात्रय कचरे, कृषी अधिकारी