पिकांच्या वाढीसाठी माती परीक्षणावर आधारित खत व्यवस्थापन उपयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:28 AM2021-06-03T04:28:12+5:302021-06-03T04:28:12+5:30

सातारा : खरीप २०२१ हंगामामध्ये रासायनिक खतांची बचत करण्यासाठी माती परीक्षणावर आधारित खत व्यवस्थापन जागृती मोहिमेंतर्गत जमीन सुपिकता निर्देशांकाच्या ...

Fertilizer management based on soil test is useful for crop growth | पिकांच्या वाढीसाठी माती परीक्षणावर आधारित खत व्यवस्थापन उपयुक्त

पिकांच्या वाढीसाठी माती परीक्षणावर आधारित खत व्यवस्थापन उपयुक्त

googlenewsNext

सातारा : खरीप २०२१ हंगामामध्ये रासायनिक खतांची बचत करण्यासाठी माती परीक्षणावर आधारित खत व्यवस्थापन जागृती मोहिमेंतर्गत जमीन सुपिकता निर्देशांकाच्या आधारे खत बचतीची विशेष मोहीम कृषी विभागामार्फत सातारा जिल्ह्यात राबविण्यात येत असल्याची माहिती सातारा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गुरुदत्त काळे यांनी दिली.

माती परीक्षणानुसार खतांचा वापर केल्यामुळे जमिनीची सुपिकता टिकवून पिकाला आवश्यक अन्नद्रव्यांचा पुरवठा योग्य प्रमाणात केला जातो तसेच काही प्रमाणात खर्चामध्ये बचत होते. माती परीक्षणाप्रमाणे खत व्यवस्थापन केल्यास रासायनिक खतांच्या शिफारशीत बदल होतो व त्यातून खतांचा वापर संतुलित केला जातो. याशिवाय माती परीक्षणाआधारे अपेक्षित उत्पादन लक्ष ठेवूनदेखील आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार अपेक्षित उत्पादन मिळते.

भात पिकामध्ये युरिया ब्रिकेटचा वापर केल्यामुळे रासायनिक खतात ४० टक्क्यांपर्यंत बचत होऊन उत्पादनात भरघोस वाढ झाल्याचे प्रयोगातून सिद्ध झाले आहे. भाताशिवाय ब्रिकेटचा वापर ऊस, भाजीपाला या पिकांमध्ये केल्यास आपल्याला खतांची कार्यक्षमता वाढविण्यास मदत होऊन उत्पादनात वाढ होते.

सुपिकता निर्देशांकाच्या आधारे कमतरता असलेल्या सूक्ष्म मूलद्रव्यांचा वापर केल्यास उत्पादनामध्ये वाढ होते. ज्या जमिनीत रासायनिक खताव्यतिरिक्त लोह, जस्त, मंगल, बोरॉन यासारख्या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता आहे, तिथे खतासोबत शिफारसीप्रमाणे सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर केल्यास पिकांचे उत्पादन वाढण्यास मदत होते.

जमिनीमध्ये नत्र उपलब्ध करणाऱ्या, स्फुरद विरघळविणाऱ्या जीवाणू खत वापराने मातीमध्ये पीक वाढीला अनुकूल वातावरण तयार होते. अन्नद्रव्याच्या पुरवठ्यात वाढ झाल्यामुळे उत्पन्नात वाढ होते. तसेच रासायनिक खतांचा काही प्रमाणात पूरक म्हणून जीवाणू खतांचा वापर केल्यास रासायनिक खतात बचत करून फायदा मिळवता येतो.

चौकट

सेंद्रिय खत वाढवतेय अन्नद्रव्ये!

सेंद्रिय खतांच्या वापरामुळे जमिनीच्या जैविक व भौतिक सुपिकतेत वाढ होते तसेच सेंद्रिय कर्बाचे प्रमाणात वाढ होऊन अन्नद्रव्ये उपलब्ध होण्याचे प्रमाण वाढते म्हणून रासायनिक खतांबरोबर सेंद्रिय खतांचा वापर लागणीपूर्वी किंवा लागवडीच्या वेळेस केल्यास सेंद्रिय खतांची होणारी अन्नद्रव्यांची उपलब्धता ही सावकाश होत असते. यामध्ये शेणखत, पाचटाचे कंपोस्ट खत, कंपोस्ट खत, गांडूळखत, हिरवळीची खते यासारख्या सेंद्रिय घटकांचा वापर केल्यास जमिनीची सुपिकता वाढण्यास मदत होते.

रासायनिक खतांच्या कार्यक्षम वापराबाबत आवश्यक बाबी (आवश्यक असल्यास)

१. खतांची मात्रा एकाचवेळी न देता वेगवेगळ्या वेळी विभागून द्यावी.

२. खते व बियाणे दोचाड्याच्या पाभरीने पेरून द्यावीत.

३. युरियाबरोबर लिंबोळी पेंडीचा वापर करावा.

४. चुनखडीयुक्त जमिनीत अमोनियम सल्फेट तसेच स्फुरदयुक्त खते जमिनीच्या पृष्ठभागावर फेकून न देता पेरून द्यावीत.

५. सुपर फॉस्फेटयुक्त खते शेणखतात मिसळून दिल्यास स्फुरदाची उपयुक्तता वाढते.

६. पिकांचा फेरपालटीत कडधान्य हिरवळीच्या पिकांचा समावेश करावा म्हणजे सेंद्रिय कर्ब जमिनीत वाढून खतांचा कार्यक्षम वापर होईल.

७. पिकांच्या गरजेनुसार रासायनिक खतांचा पुरवठा करावा.

८. माती परीक्षण अहवालानुसार कमतरतेप्रमाणे सूक्ष्म अन्नद्रव्याव्यतिरिक्त रासायनिक खतांचा शेणखतामधून जमिनीमध्ये वापर करावा.

९. फवारणीसाठी लोह, मंगल, जस्त, तांबे इत्यादी सूक्ष्म अन्नद्रव्ये चिलेटेड स्वरूपात द्यावीत.

कोट

शेतकऱ्यांनी खत व्यवस्थापन केल्यास मोठ्या प्रमाणावर खतांची व पैशाची बचत होते व उत्पादनात वाढ होऊन जमिनीची सुपिकता टिकवून ठेवण्यास मदत होते. माती परीक्षणावर आधारित खत व्यवस्थापन जागृती मोहिमेंतर्गत जमीन सुपिकता निर्देशांकाच्या आधारे खत बचतीची विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा.

- गुरूदत्त काळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

Web Title: Fertilizer management based on soil test is useful for crop growth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.