खताची जादा दराने विक्री भोवली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:39 AM2021-05-26T04:39:03+5:302021-05-26T04:39:03+5:30

सातारा : केंद्र शासनाच्या निर्णयामुळे कृषी निविष्ठा विक्रेत्यांना जुन्या दरानेच खतांची विक्री करायला लागणार आहे. तरीही काही विक्रेते जादा ...

Fertilizer sold at extra rate! | खताची जादा दराने विक्री भोवली !

खताची जादा दराने विक्री भोवली !

Next

सातारा : केंद्र शासनाच्या निर्णयामुळे कृषी निविष्ठा विक्रेत्यांना जुन्या दरानेच खतांची विक्री करायला लागणार आहे. तरीही काही विक्रेते जादा दराने विक्री करत असल्याचे समोर आले आहे. अशाच प्रकारे जादा दराने खत विक्री करणे कऱ्हाडमधील एका दुकानदाराला चांगलेच भोवले. शेतकऱ्याने तक्रार करताच अवघ्या २ तासात दुकानाचा परवाना निलंबित करण्यात आला. यावर्षीच्या खरीप हंगामातील जिल्ह्यामधील ही पहिली कारवाई ठरली आहे.

याबाबत कृषी विभागातून देण्यात आलेली माहिती अशी की, केंद्र शासनाने २० मे रोजी खत उत्पादक कंपन्यांना वाढीव किमतीसाठी अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे कृषी निविष्ठा विक्रेत्यांना खते आता जुन्या दरानेच विकावी लागणार आहेत. तरीही काही विक्रेते हे जादा दराने खत देत असल्याच्या तक्रारी येत आहेत. अशाच प्रकारे कऱ्हाड शहरातील एका दुकानाबाबतची तक्रार होती. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गुरुदत्त काळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अजिंक्य पवार यांच्या भरारी पथकाने कऱ्हाडमधील शाहू चौकातील हिंगमिरे फर्टिलायझर्स दुकानावर कारवाई केली. शेतकऱ्याची तक्रार प्राप्त होताच, अवघ्या २ तासात या विक्रेत्याचा परवाना निलंबित करण्यात आला. या कारवाईमुळे जिल्ह्यात जादा दराने खताची विक्री करणाऱ्याचे धाबे दणाणले आहेत.

कोणताही विक्रेता जुन्या दरातील खत वाढीव किंमत आकारून विकत असल्यास शेतकऱ्यांनी तत्काळ तक्रार करावी. याबाबत तालुका कृषी अधिकारी, पंचायत समिती कृषी अधिकारी किंवा जिल्हा संनियंत्रण कक्ष यांच्याकडे तक्रार द्यावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गुरुदत्त काळे यांनी केले आहे.

........................................................................

Web Title: Fertilizer sold at extra rate!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.