खताची पोतीही न पुरणाऱ्यांनी बोलू नये
By admin | Published: March 22, 2015 10:47 PM2015-03-22T22:47:35+5:302015-03-23T00:41:41+5:30
‘किसन वीर’मध्ये घडतंय-बिघडतंय : प्रमोद शिंदे यांना मधुकर शिंदे यांचा टोला
भुर्इंज : ‘सोसायटीच्या माध्यमातून गोरगरीब शेतकऱ्यांना अनुदान म्हणून मिळणारी खताची पोतीही ज्यांना पुरत नाहीत. त्यांनी किसनवीर कारखान्याच्या कारभारावर बोलू नये,’असा टोला जांबचे माजी सरपंच पै. मधुकर शिंदे यांनी लगावला.
वाई पंचायत समितीचे माजी सभापती प्रमोद शिंदे यांनी ििनवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारखान्याच्या कारभारावर टीका केली होती. त्याला उत्तर देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिंदे म्हणाले, ‘एखाद्या घटनेची माहिती देण्याचे काम प्रमोद शिंदे यांना कोणी सांगितले असेल तर त्यांनी ते तेवढंच करायला हवं होतं. विषय सोडून कारखान्याच्या कारभारावर बोलण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही. आपण आपल्या गावातील ज्या सोसायटीचा कारभारीपणा करत आहात. त्या सोसायटीच्या कारभाराची वेशीवर टांगलेल्या लक्तरांकडे पाहावे. सोसायटीत अनेक सभासदांच्या नावावर परस्पर कर्ज टाकून प्रत्यक्षात खतं मात्र नेमकी कुठे गेली हे अजून कळलेले नाही. ज्या सभासदांनी स्वत: कर्ज काढली होती. त्यांनी कर्जाचे हप्ते फेडूनही प्रत्यक्ष खात्यात मात्र ते पैसे दोन-दोन वर्षे का जमा केले गेले नाहीत? माजी सैनिक, महिला आणि वृद्धांनाही या गैरकारभाराचा फटका बसला आहे. या फसवणुकीमुळे लोकांच्या गळ्याला फास लागायची वेळ आली. लोकं सोसायटीत जाऊन ढसाढसा रडली, हे प्रमोद शिंदे विसरले की काय?,’ असा सवालही त्यांनी केली.
‘बारा वर्षांपूर्वीचा कारखाना आणि आताचा कारखाना हा फरक तुम्हाला कसा दिसत नाही? ‘तुम्ही ज्यांच्या सहवासात आहात त्यांचा वाण नाही; पण गुण लागला आहे. इतर हजारो सभासद, शेतकऱ्यांना विविध मान्यवरांना जे दिसतं ते तुम्हालाच का दिसत नाही? नेत्यांनी आदेश देताच उचलली जीभ लावली टाळ्याला असले उद्योग बंद करा. किसन वीर कारखान्याने सर्वप्रथम एफआरपीप्रमाणे दर देऊन दराची कोंडी फोडली. तुम्ही मात्र गावातील ऊस बाहेरच्या कारखान्यांना पाठवत आहात. असेही ी पै. मधुकर शिंदे यांनी म्हटले आहे. (वार्ताहर)
आता हा घ्या पुरावा...
जांब विकास सेवा सोसायटीचे अध्यक्ष आणि सचिवांनी सहायक निबंधकाकडे चुकीची आर्थिक पत्रके सादर केल्याचे सिद्ध झाले आहे. याबाबत सहायक निबंधकांनीच अधिनियम १९६० चे कलम ७९ नुसार बजावलेली नोटीस मधुकर शिंदे यांनी सादर केली. या नोटीसमध्ये चुकीची आर्थिक पत्रके सादर केल्याचे स्पष्ट केले. सहायक निबंधकांनी बजावलेली ही नोटीस खोटी आहे, हे सांगण्याचे धाडस प्रमोद शिंदे यांच्याकडे आहे काय? असा सवाल मधुकर शिंदे यांनी केला आहे.