उत्सवप्रियतेपोटी वनश्रीला ‘प्लास्टिकभोजन’

By admin | Published: July 22, 2015 09:45 PM2015-07-22T21:45:43+5:302015-07-22T23:59:16+5:30

प्लास्टिक पत्रावळींच्या वापरात वाढ : वनअधिकाऱ्यासंह प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष

Festive Taste Vanasthila 'Plastic Food' | उत्सवप्रियतेपोटी वनश्रीला ‘प्लास्टिकभोजन’

उत्सवप्रियतेपोटी वनश्रीला ‘प्लास्टिकभोजन’

Next

संतोष गुरव - कऱ्हाड : सामाजिक उत्सवप्रियतेपोटी आजच्या काळात काही नागरिकांकडून पर्यावरणाचे प्रदूषण केले जात आहे. विविध सामाजिक, सांस्कृतिक तसेच धार्मिक कार्यक्रमाच्या नादात पर्यावरणाची जपणूक करण्याचा विसर नागरिकांना पडला आहे. यामुळे पर्यावरणाचे प्रदूषण हे दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. आपल्या उत्सवप्रियतेच्या पोटी होणाऱ्या प्रदूषणाबाबत प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जाणे गरजेचे आहे. याकडे कुणी गांभीर्यपणे लक्ष देताना दिसून येत नाही.
सध्या तालुक्यात ठिकठिकाणी लग्न, बारसे, वाढदिवस तसेच विविध धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. या कार्यक्रमांच्या माध्यमातून पर्यावरणाचे प्रदूषण होत असल्याचा प्रकार दिसून येत आहे. काही उत्सवप्रिय लोकांकडून पर्यावरणाचा विचार न करता प्लास्टिकच्या पत्रावळ्या, ग्लास, पाण्याच्या बाटल्या उघड्यावर टाकून वनश्रीलाच जणू प्लास्टिकभोजन देत प्लास्टिकचे प्रदूषण केले जात आहे.
बदलत्या काळानुसार आता लग्न कार्यालाही आधुनिक स्वरूप प्राप्त झाले आहे. लग्नकार्य म्हटलं की, खर्च करेल तेवढा अपुराच असतो. लग्न कार्यामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचे प्रदूषण केले जाते. ध्वनीप्रदूषण, जलप्रदुषण तसेच मोठ्या प्रमाणात फटाके वाजवून वायू प्रदूषणही केले जाते. लग्न, बारसे तसेच धार्मिक कार्यक्रमांत कमी पैशात मिळणाऱ्या प्लास्टिकच्या पत्रावळ्या, द्रोण, पाणी पिण्याचे ग्लास जास्त प्रमाणात वापरले जातात. त्यांना नंतर उघड्यावरच टाकले जात असल्याने प्रदूषणात आणखी भर पडत आहे.
झाडांच्या पाणापासून बनवलेल्या पत्रावळीपेक्षा, चांदीच्या ताटाप्रमाणे दिसणाऱ्या प्लास्टिकच्या पत्रावळ्यांचा वापर सध्या सर्वत्र केला जाऊ लागला आहे. मात्र, जेवणानंतर पत्रावळ्या रस्त्यालगत नाल्यात, मोकळ्या जागेत टाकल्या जात आहे. त्यामुळे पर्यावरणाला हा कचरा हानिकारक ठरत आहे.
पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या वापरावर शासनाची बंदी असतानाही अशा पिशव्या, फास्टफुडचे पाऊच, गुटख्याचे पाऊच, ग्लास व इतर प्लास्टिक याचा राजरोसपणे वापर होत आहे. प्लास्टिकची पत्रावळी तयार करताना त्याला पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकचे आवरण घातले जाते. यातून प्लास्टिकचा सर्रास वापर हा उघडपणे केला जातो.
टाकून दिलेले अन्न जनावरांनी खाल्ल्यामुळे त्यांना गंभीर आजार जडण्याची शक्यता असते, तसेच गटारामध्ये वारंवार साचून त्यातून दुर्गंधीयक्त पाणी साचून डांसांची वाढ होऊ शकते. या गोष्टीकडे मात्र, वनविभाकडून सर्रासपणे दुर्लक्ष केले जात आहे.
आज कऱ्हाड तालुक्यात तसेच ग्रामीण भागात लग्नकार्यात ही परिस्थिती दिसून येत आहे. या लग्नकार्यासह विविध धार्मिक कार्यक्रमांतून होत असलेल्या प्लास्टिकच्या पत्रावळ्याचा वापरावर बंदी घालणे गरजेचे आहे. या प्लास्टिक वापराच्या बंदीबाबत वनक्षेत्रपाल व पर्यावरणप्रेमींकडून पुढाकार घेऊन प्रत्यक्ष कारवाई करणे गरजेचे आहे. मात्र, त्यांच्याकडून केले जात नसल्याचे दिसून येत आहे.

पानांच्या जागी प्लास्टिकची पत्रावळ
पूर्वीच्या काळी ग्रामीण भागात झाडांच्या पानांपासून पत्रावळी तयार केली जात असे. यावेळी गावाबाहेर असलेल्या जंगलात तसेच रानावनात जाऊन झाडांची पाने तोडून त्यापासून पत्रावळी तसेच द्रोण तयार करून सण, उत्सव तसेच लग्नकार्यात वापरली जात असे. बदलत्या काळाबरोबर परिस्थितीत ही बदल झाली आहे. आता घरबसल्या मशीनच्या साह्याने प्लास्टिकचा वापर करून पत्रावळी तसेच द्रोण तयार केले जात आहे.
प्लास्टिकच्या पत्रावळ्यामुळे होणारे दुष्परिणाम
प्लास्टिक कचऱ्यामुळे पर्यावरणाचे दुष्परिणाम तर होतोच. शिवाय मनुष्य आणि प्राण्यांनाही त्याचा त्रास सहन करावा लागतो. उघड्यावर अस्ताव्यस्त पडलेल्या प्लास्टिकच्या पत्रावळ्यावर सूर्याच्या अल्ट्राव्हायोलेट किरणांचा मारा झाल्यास त्यातून वायू बाहेर पडून हवा प्रदूषित होते. हवा प्रदुषणामुळे कॅन्सर, किडणी व फुफ्फुसे निकामी होणे, बे्रन डॅमेज, नर्व्ह सिस्टीम ब्रेकडाऊन होणे, अशा प्रकारे प्लास्टिकचा मानवी शरीरावर परिणाम होतो. तरीही याचा वापर पत्रावळी तयार करण्यासाठी केला जातो.

प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच वनअधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
प्लास्टिक कागदापासून अनेक वस्तू बनवले जातात. लहान शाळेतील मुलांचे टबे, फास्टफुडचे पाऊच, गुटख्याचे पाऊच, ग्लाससाठी मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा वापर केला जातो. तसेच पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या वापरावर शासनाची बंदी असतानाही याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच वनअधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

Web Title: Festive Taste Vanasthila 'Plastic Food'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.