दुर्गम कांदाटी खोऱ्यातील महिलेची बोटेत प्रसूती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:40 AM2021-02-24T04:40:38+5:302021-02-24T04:40:38+5:30
परळी : दुर्गम कांदाटी खोऱ्यातील पिंपरी तर्फ तांब येथील विवाहितेला प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या; पण सोसाट्याचा वारा असल्याने रुग्णालयापर्यंत ...
परळी : दुर्गम कांदाटी खोऱ्यातील पिंपरी तर्फ तांब येथील विवाहितेला प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या; पण सोसाट्याचा वारा असल्याने रुग्णालयापर्यंत घेऊन जाणे शक्य नव्हते. एका बोटीतून बोमणोलीपर्यंत आणण्याचा प्रयत्न सुरू केला; पण बामणोली आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर मोरे सहकाऱ्यांसमवेत बोटीपर्यंत पोहोचले अन् बोटीतच प्रसूती केली.
याबाबत माहिती अशी की, पिंपरी गावातील एकता जाधव या गरोदर असल्याने त्यांना रविवारी (दि. २१) रात्री वेदना होऊ लागल्या. खूप मोठ्या प्रमाणावर वादळ असल्याने त्यांना तापोळा आरोग्य केंद्रात नेणे शक्य नव्हते. कसेतरी बोटवाल्याने त्यांना बामणोलीपर्यंत आणले. बोट काठावर लागण्यापूर्वी डॉ. ज्ञानेश्वर मोरे यांना बोटीवर बोलावण्यात आले होते. मात्र त्यांच्याकडे दुसरी एक प्रसूती असल्याने त्यांनी आपले इतर कर्मचारी पुढे बोटीकडे पाठविले. पाठोपाठ डॉ. मोरे हेदेखील बोटीकडे पोहोचले. जाधव यांना वेदना असह्य होत असल्याने त्यांना आरोग्य केंद्रात नेणे शक्य नव्हते. शेवटी डॉ. मोरे व पवार व पाडवी नर्स यांनी बोटीतच यशस्वीपणे महिलेची प्रसूती केली. त्यानंतर त्यांना बामणोली आरोग्य केंद्रात हलवण्यात आले. तापोळा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत नोंदणी असलेली गरोदर माता यांची यशस्वी प्रसूती केल्याबद्दल रुग्णाच्या आजीकडून डॉ. ज्ञानेश्वर मोरे यांचा सत्कार करण्यात आला.
चौकट
मध्यरात्री दोन किलोमीटरचा पायी प्रवास
सदर प्रसूतीसाठी डॉ. ज्ञानेश्वर मोरे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी मध्यरात्री दीड वाजता दोन किलोमीटर चालत प्रवास केला. वारा जास्त होता आणि रुग्ण बोटीने कोयना धरणामधून येत होता; पण त्यांची बोट किनारी लागत नसल्यामुळे दुसऱ्या बोटीतून जाऊन, तिथेच बोटमध्ये नॉर्मल प्रसूती केली. रविवार साप्ताहिक सुटी असूनही सुद्धाही मुख्यालयात थांबून काम करतात. यामुळे त्यांची यावेळी खूप मदत झाली.