मैदान रिकामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:26 AM2021-06-29T04:26:18+5:302021-06-29T04:26:18+5:30
सातारा : साताऱ्यातील गांधी मैदानावर विक्रेत्यांनी फुलला होता. राजवाडा, देवी चौक दरम्यानच्या रस्त्यावरील विक्रेत्यांना गांधी मैदानावरील रिकाम्या जागेत हलविण्यात ...
सातारा : साताऱ्यातील गांधी मैदानावर विक्रेत्यांनी फुलला होता. राजवाडा, देवी चौक दरम्यानच्या रस्त्यावरील विक्रेत्यांना गांधी मैदानावरील रिकाम्या जागेत हलविण्यात आले होते. त्यामुळे सणाच्या काळात रस्त्यावरील कोंडी कमी होण्यास मदत झाली होती. परिसर कायम गजबजलेला असायचा. तो शांत झाला आहे.
सिग्नलची आवश्यकता
सातारा : साताऱ्यातील मोळाचा ओढा येथून एक रस्ता पुण्याकडे तर एक रस्ता महाबळेश्वरकडे गेला आहे. या ठिकाणी सुसाट वाहने अचानक ट्रॅक बदलून पुण्याकडे वळतात. त्यामुळे अपघातांचा धोका वाढत आहे. वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी सिग्नल यंत्रणा सुरू करावेत, अशी मागणी होत आहे.
मंदिरे अजूनही बंदच
सातारा : राज्य शासनाने कोरोनानंतर बंद केलेली मंदिरे उघडण्यास परवानगी दिली आहे. यामुळे एकीकडे समाधानाचे वातावरण असले तरी कोरोनाचा धोका कमी झालेला नाही. ही बाब लक्षात घेऊन काही मंदिरे अजूनही बंद ठेवण्याचा निर्णय संबंधित देवस्थानच्या विश्वस्तांनी घेतलेला आहे.
मंडईजवळच कचरा
कोरेगाव : कोरेगाव शहरातील आझाद चौकात असलेल्या भाजी मंडईजवळ मोठ्या प्रमाणावर कचरा साठत आहे. संबंधित कचरा उचलला जात नसल्याने तेथेच भाजीविक्री केली जाते. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. शक्यता गृहीत धरुन कचरा हटवावा, अशी मागणी केली जात आहे.
खंबाटकी घाटात प्रखर दिव्यांची मागणी
सातारा : साताऱ्याकडून पुण्याकडे जाण्याच्या मार्गात खंबाटकी बोगदा लागतो. या बोगद्यातूनच दररोज हजारो वाहनांची वर्दळ असते. मात्र अनेक दिवस झालेले असल्याने घाटात मध्यभागात गेल्यानंतर प्रकाश कमी झाल्याचे जाणवत असते. त्यामुळे काही अंतरावरचेही दिसत नाही. त्यामुळे दुचाकीस्वारांना अपघाताचा धोका वाढला आहे. या ठिकाणी प्रखर प्रकाशाचे दिवे बसविण्याची मागणी होत आहे.
खड्डेमुक्तीमुळे समाधान
वडूज : खटाव तालुक्यातील बहुतांशी मुख्य रस्त्यावरील खड्डे मुजविल्याने चालकांसहित वाहनधारकांना होणारा शारीरिक व आर्थिक त्रासाचे प्रमाण कमी झाल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे, तर संबंधित प्रशासनाने वेळीच उपाययोजना केल्याने चांगली सोय झाली आहे.
रिक्षा वाहतूक धोक्याची
सातारा : साताऱ्यातील नागरिक शहरातील प्रवासासाठी रिक्षाचा आधार घेत आहेत. मात्र, साताऱ्यातील अनेक रिक्षाचालक हे ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांना वाहन चालविणे कितपत चांगल्या पद्धतीने जमते याचा विचार करण्याची गरज आहे. त्यांना किती अंतरावरचे दिसते हाही प्रश्न निर्माण होत आहे.
बेसुमार उत्खनन
सातारा : सातारा शहर परिसरात बेसुमार वाळू उत्खनन केले जात आहे. त्यामुळे भविष्यात निसर्गाची मोठ्या प्रमाणावर समस्या उद्भवू शकते. यामुळे डोंगरच्या डोंगर पोखरले जात आहे. हे उत्खनन थांबविण्याची मागणी पर्यावरणप्रेमींमधून केली जात आहे.
रात्रगस्तीची मागणी
सातारा : गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागात मद्यपान करून वाहने चालविण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अपघातांच्या संख्येत वाढ होत आहे. हे तरुण पिढीसाठी धोकादायक आहे. त्यामुळे ग्रामीण भागात रात्रगस्त वाढविण्याची मागणी ग्रामीण भागातून करण्यात येत आहे.
तळ्यांतील पाणी दूषित
सातारा : सातारा शहरात पूर्वीपासून पाणीपुरवठ्यासाठी योग्य नियोजन करण्यात आले होते. त्यासाठी ठिकठिकाणी तळी तयार केली आहेत. मात्र, त्याकडे संबंधित विभागाचे लक्ष नाही. त्यामुळे तळ्यांमधील पाणी हिरवे पडले आहे. त्याचा फटका त्यातील माशांना बसत असून ते मृत्युमुखी पडत आहेत.
टोलनाक्यावर वाहनचालकांची तपासणी
सातारा : अनेक तरुण मद्यपान करून वाहने चालवत असतात. यातून अनुचित प्रकार घडू नये म्हणून वाहनचालकांची पोलिसांकडून कसून तपासणी केली जात आहे. पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील आनेवाडी टोलनाक्यावर काही दिवसांपासून कसून तपासणी केली जात आहे.
पत्रपेटीची सोय
सातारा : बदलत्या काळानुसार मोबाईल क्रांती झाली अन् टपाल सेवेचा वापर कमी झाला, पण तरीही साताऱ्यातील टपाल कार्यालयाने मंगळवार तळे परिसरात पत्राची पेटी बसवली आहे. या परिसरात कर्तव्य बजावत असलेले कर्मचारी त्यात टपाल आले का, हे पाहत असतात.