सत्ताधाऱ्यांविरुद्ध ‘फिल्डिंग’
By Admin | Published: July 26, 2015 09:41 PM2015-07-26T21:41:48+5:302015-07-27T00:18:12+5:30
खंडाळा तालुका : ग्रामपंचायत निवडणुकीत सत्ताधाऱ्यांची प्रतिष्ठा पणाला; काँग्रेस-राष्ट्रवादी आमने-सामने
शरद ननावरे -खंडाळा -खंडाळा तालुक्यातील ५५ ग्रामपंचायतींपैकी सहा गावे बिनविरोध झाली असून, उर्वरित ग्रामपंचायतींसाठी रणधुमाळी सुरू झाली आहे. बहुतांशी ग्रामपंचायतींमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशीच सरळसरळ लढत असून, काही गावांत शिवसेना, भाजप तर स्वाभिमानी, आरपीआयचेही उमेदवार उभे केलेले आहेत. सत्ताधारी पॅनेलच्या विरोधात विरोधक एकवटल्याने लढती चुरशीच्या होणार असून, कार्यकर्त्यांपेक्षा नेत्यांचीच प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे तालुक्याचे राजकारण हाताळणाऱ्या मंडळींनाही गावच्या वेशीबाहेर पडणे मुश्कील झाले आहे.
तालुक्याच्या वाढत्या औद्योगिकीकरणामुळे ग्रामपंचायतींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे या स्वराज्य संस्थेत एक खुर्ची आपल्याही नावाची असावी, यासाठी प्रत्येकजण इच्छुक आहेत. त्यामुळे काही ठिकाणी पॅनेलव्यतिरिक्त अपक्षांचेही पीक जोमाने वाढले आहे. तालुक्याच्या सध्याच्या परिस्थितीनुसार खंडाळा, अहिरे, नायगाव, अंदोरी, खेड, बोरी, पाडळी, बावडा, शिंदेवाडी, भादे, ग्रामपंचायतीसाठी मोठी चुरस असल्याने या लढती अटीतटीच्या होणार आहेत. परंतु सर्वत्र निवडणूक ग्रामपंचायतीची प्रतिष्ठा नेत्यांची अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे.
सर्वाधिक मोठ्या असलेल्या खंडाळा ग्रामपंचायतीसाठी काँग्रेसचे विद्यमान पंचायत समिती सदस्य अनिरुद्ध गाढवे व राष्ट्रवादीचे समन्वय समितीचे अध्यक्ष शामराव गाढवे यांच्या पॅनेलमध्ये चुरस आहे. अहिरे ग्रामपंचायतीसाठी राष्ट्रवादीचे सभापती रमेश धायगुडे व काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्या वंदना धायगुडे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. इतिहासात आजपर्यंत बिनविरोधचा डंका मिरविणाऱ्या पळशी ग्रामपंचायतीत प्रथमच निवडणूक लागली असून, येथे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे-पाटील यांच्यासमोरच आव्हान निर्माण झाले आहे. नायगाव ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीचे नेते व समता परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र नेवसे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
भादे ग्रामपंचायतीत पंचायत समितीच्या सदस्या दीपाली साळुंखे, काँग्रेसच्या महिला अध्यक्षा सुनीती धायगुडे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अंदोरीत जिजाबा धायगुडे यांची ताकद अजमावली जात असून, कोपर्डे ग्रामपंचायतीत मुंबई बाजार समितीचे संचालक रमेश शिंदे यांची तर खेड बुद्रुक ग्रामपंचायतीत माजी सदस्य बापूराव धायगुडे, बाजार समितीचे माजी सभापती नामदेवराव धायगुडे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर पारगाव ग्रामपंचायतीत जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष बकाजीराव पाटील तसेच बावडा ग्रामपंचायतीत युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष मनोज पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
रंगतदार लढती...
खंडाळा तालुक्यात ग्रामपंचायतीच्या वर्चस्वावरच पंचायत समिती व जिल्हा परिषदेची गणिते मांडली जातात. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या कडव्या संघर्षात काही जागी शिवसेनेने उडी घेतल्याने लढती रंगतदार होणार आहेत. त्यामुळे गावागावातून आता रात्री जागवल्या जात आहेत.