Satara Bus Accident: पोलादपूरच्या आंबेनळी घाटातल्या खोल दरीतून आतापर्यंत 14 मृतदेह काढले बाहेर, अंधार पडल्यानं बचावकार्य थांबवलं
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2018 01:00 PM2018-07-28T13:00:32+5:302018-07-28T21:47:52+5:30
Satara Bus Accident: महाबळेश्वर-पोलादपूर रस्त्यावरील आंबेनळी घाटात एक मिनी बस कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे. घाटातील निसरड्या रस्त्यावरून ही बस दरीत जवळपास सहाशे फूट खाली गेल्याचे समजते. या दुर्घटनेत 33 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक आमदार भरत गोगावले यांनी दिली.
सातारा/पोलादपूर : महाबळेश्वर-पोलादपूर रस्त्यावरील आंबेनळी घाटातील 600 फूट खोल दरीत मिनी बस कोसळून भीषण अपघात झाला आहे. घाटातील निसरड्या रस्त्यावरून ही बस दरीत किमान सहाशे फूट खाली गेल्याचे समजते. या दुर्घटनेत 33 प्रवासी ठार झाल्याची माहिती देण्यात आली आहे. तर सुदैवाने बसमधील एक प्रवासी बचावला. प्रकाश सावंत-देसाईअसे बचावलेल्या प्रवाशाचे नाव आहे. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच महाबळेश्वर येथील पोलीस अन् ट्रॅकर्सचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले असून, आपत्कालीन विभागाच्या मदतीनं त्यांनी आतापर्यंत 14 मृतदेह बाहेर काढले आहेत. काळोख पडल्यानं आता बचावकार्य थांबवण्यात आलं आहे.
बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथील साधारण 34 कर्मचारी महाबळेश्वर येथे विद्यापीठाच्या बसने सहलीला निघाले होते. त्यावेळी पोलादपूर पासून 15 किमी अंतरावर आंबेनळी दरीत बस कोसळली. या दुर्घटनेत बसमधील 33 प्रवाशांचा मृत्यू झाला असून एक प्रवासी सुदैवाने बचावला आहे. सध्या घटनास्थळावर मदत करण्यासाठी पोलादपूर पोलीस स्टेशन येथील संपूर्ण स्टाफ, महसूल विभाग, तसेच महाबळेश्वर येथील बचाव पथक आणि वैद्यकीय पथक हजर झाले आहे. सातारा जिल्ह्यातून रायगड जिल्ह्याकडे जाणाऱ्या बसमधून कृषी विद्यापीठाचे कर्मचारी सहलीसाठी प्रवास करत होते. दरम्यान, ही बस दापोली येथील असल्याचे समजते.