चोरट्यांच्या भीतीने गावागावात भागम्भाग!
By admin | Published: July 12, 2015 09:14 PM2015-07-12T21:14:08+5:302015-07-12T21:14:08+5:30
चोर पाहिला का चोर ? : कुणी म्हणे पाठलाग केला, तर कुणी म्हणे... तंबाखू मागितली; ग्रामस्थांची पाचावर धारण; युवकांची रात्रगस्त; शिवार भयग्रस्त
कऱ्हाड/तारळे/मलकापूर : कऱ्हाडसह पाटण तालुक्यातील काही भाग सध्या चोरट्यांच्या दहशतीखाली आहे. चोर पाहिल्याच्या चर्चा दररोज रंगत आहेत. तसेच काही ठिकाणी तर चोरट्यांचा पाठलाग केल्याचे व चोरटे उसाच्या फडात पळून गेल्याचेही सांगितले जात आहे. मात्र, अद्याप एकही चोरटा कोणाच्या हाती लागलेला नाही. पोलीसही हतबल असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
कऱ्हाड तालुक्यातील पाचवड, कापिल, गोळेश्वर, आटके, काले, धोंडेवाडी, नांदगाव, ओंड, उंडाळे, ओंडोशी, तुळसण, साळशिरंबे, जिंती या गावांमध्ये चोरांची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. आज या गावात तर उद्या दुसऱ्या गावात चोरटे दिसून आल्याचे तसेच त्यांनी काही ग्रामस्थांना अडविल्याचे दमदाटी केल्याचे सांगितले जात आहे. चोरट्यांच्या दमदाटीचे किस्सेही रंगवून चर्चिले जात आहेत. मात्र, या एकाही गावात अद्याप चोरटा कोणालाही सापडलेला नाही. युवक रात्रगस्त घालत असूनही चोरटे त्यांच्या हाताला लागत नाहीत. पाटण तालुक्यातील तारळे विभागातही चोरट्यांचा धुमाकूळ सुरू असल्याचे सांगितले जाते. सुरुवातीला राहुडे गावात चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. त्यानंतर तारळेत चार पाच ठिकाणी तसाच प्रयत्न झाला. वेखंडवाडी, पांढरवाड, धनगरवाडी, आंबळे, काळफूटवाडी, अवाडे, कोजवडे, नुने, दुटाळवाडी अशा छोट्या-छोट्या गावाकडेही चोरट्यांनी आपला मोर्चा वळविला होता, असे ग्रामस्थांचे मत आहे. अनेकांनी चोरट्यांना पाहिल्याचेही छातीठोकपणे सांगितले.
पाली-राहुडे रस्त्यावरील नर्सरी ते तारळे डोंगरापर्यंत चोरट्यांना लपण्यास मुबलक जागा असल्याने चोरटे त्याच परिसरात लपून बसले असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्या परिसराची पोलिसांनी तरूणांच्या मदतीने तपासणी केली; पण उसाच्या पिकांमुळे अडचणी येत आहेत. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नवख्या संशयितांची, विक्रेत्यांची, गावकऱ्यांसह पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात येत आहे; पण अजूनपर्यंत ठोस माहिती अथवा एखादा संशयित सापडत नाही.
चोरटे इकडे-तिकडे दिसत असल्याचे कळत असतानाचा काही ठिकाणी घरांवर दगड पडू लागल्याने लहान-मोठ्यांमध्ये सुध्दा घबराटीचे वातावरण पसरले आहे. दोनचाकी चारचाकी वाहनांतून चोरटे फिरत असल्याचे काही लोकांकडून सांगण्यात येत आहे. रात्री-अपरात्री चोऱ्या होण्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत; पण दोन-तीन दिवसांत वातावरण पूर्वपदावर येत होते. यावेळी मात्र आठ-दहा दिवसांपासून चोरट्यांच्या टोळक्याने दहशत निर्माण केली आहे. रात्री तसेच दिवसाही ग्रामस्थ घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत. तसेच महिलांसह शाळांमध्ये जाणाऱ्या मुलांमध्येही भीतीचे वातावरण असून, ग्रामस्थ मुलांना सोडण्यासाठी शाळेपर्यंत जात आहेत. (प्रतिनिधी/वार्ताहर)
शेतकरी सहाच्या आत घरात !
कऱ्हाड तालुक्यात चोरट्यांचा वावर वाढल्याने काही दिवसांत चांगलेच दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रानातून किंवा कामावरून रात्री अपरात्री उशिरा येणारे सर्वजण सध्या सहाच्या आत घरात परतत आहेत. दहशत एवढी जास्त आहे की, कोणत्याही कारणाने उशीर झाल्यास तेथेच मुक्काम करतात. काहींनी तर रात्रीचे कामही सोडून दिले आहे.
चोरीचा उद्देश की फक्त दहशतीचा प्रयत्न
गेल्या आठ दिवसांपासून चोरट्यांच्या टोळक्याने तारळेसह परिसरामध्ये धुमाकूळ घातला आहे. फक्त एका ठिकाणी चोरी करण्यात चोरट्यांना यश आले. इतर ठिकाणी मात्र त्यांना हूसकावून लावण्यात आले आहे. तरीही चोरट्यांचे प्रयत्न सुरूच आहेत. त्यामुळे चोरट्यांना नक्की चोऱ्या करायच्या का दहशत माजवायची आहे, हा प्रश्न आहे.
काळे टी-शर्ट अन बरमुडा
ज्यांनी चोरट्याला पाहिले असे सांगितले अशा कुणाकडे ठोस पुरावा नाही. दाट ऊसशेतीचा फायदा घेऊन चोरटे पसार होतात, असेच सर्वजण सांगतात. मात्र बहुतांश गावांमधून झालेल्या चर्चेतून चोरट्यांच्या पेहरावाचे वर्णन मात्र काळे टी-शर्ट व बरमुडा असे एकच येत आहे.
मालक असेल तरच मजूर शेतात
सध्या रानात सर्वत्र भांगलणीचा किंवा पिकातील अंतर्गत मशागतीचा हंगाम सुरू आहे. कापिल-गोळेश्वरसह तालुक्यात चोरट्यांच्या दहशतीचे वातावरण असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतमजूर मिळणे कठीण झाले आहे. ‘मालक, तुम्ही जर आमच्याबरोबर येणार असाल तरच आम्ही कामावर येऊ,’ अशी अट मजुरांकडून मालकांना घातली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनाही मजुरांसोबत दिवसभर शेतात थांबावे लागत आहे. या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांची कामे खोळंबली आहेत.
चोरट्यांनी बंदूक रोखल्याचीही चर्चा
पाली नर्सरी ते राहुडेदरम्यान, आजपर्यंत दोन प्रवाशांचा चोरट्यांच्या टोळक्याने रात्रीच्या वेळी पाठलाग केल्याचे सांगितले जाते. त्या दोघांचाही दुचाकीवरूनच पाठलाग करण्यात आल्याचे व तारळेत एका ठिकाणी चारचाकी वाहनातून गस्त घालणाऱ्यांना बंदूक दाखविल्याचेही बोलण्यात येत असल्याने रात्रीच्या वेळी वाहने घेऊन फिरणाऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण आहे. पाली-तारळे रस्त्यावर रात्रीचा प्रवास सध्या बंदच असल्याची परिस्थिती आहे.
पोलिसांचीही दमछाक
तारळेत पोलिस दूरक्षेत्र असून लोकसंख्येच्या मानाने बोटावर मोजण्याइतकेच कर्मचारी आहेत. त्यातही अनेकवेळा अतिरिक्त कामामुळे दूरक्षेत्र बंदच असते. सध्या चोरट्यांचा धुमाकूळ असूनही कधी एक, कधी दोन कर्मचारी रात्रड्युटीला असतात. चोरटे कधी एका टोकाला, कधी दुसऱ्या टोकला तर कधी तिसऱ्याच गावात असल्याची माहिती मिळते. त्यामुळे पोलिसांची सुध्दा दमछाक होत आहे.
चोरट्यांनी बंदूक रोखल्याचीही चर्चा
पाली नर्सरी ते राहुडेदरम्यान, आजपर्यंत दोन प्रवाशांचा चोरट्यांच्या टोळक्याने रात्रीच्या वेळी पाठलाग केल्याचे सांगितले जाते. त्या दोघांचाही दुचाकीवरूनच पाठलाग करण्यात आल्याचे व तारळेत एका ठिकाणी चारचाकी वाहनातून गस्त घालणाऱ्यांना बंदूक दाखविल्याचेही बोलण्यात येत असल्याने रात्रीच्या वेळी वाहने घेऊन फिरणाऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण आहे. पाली-तारळे रस्त्यावर रात्रीचा प्रवास सध्या बंदच असल्याची परिस्थिती आहे.