पंधरा दिवसांनंतरही दरडीचा धोका!

By admin | Published: September 6, 2016 10:29 PM2016-09-06T22:29:20+5:302016-09-06T23:44:07+5:30

महाबळेश्वरात माळीणची छाया : डोंगरमाथ्यावरील गावांमध्ये भीती; सांगा दरड हटविणार कधी?, संतप्त ग्रामस्थांचा सवाल

Fifteen days after the risk of tremors! | पंधरा दिवसांनंतरही दरडीचा धोका!

पंधरा दिवसांनंतरही दरडीचा धोका!

Next

अजित जाधव-- महाबळेश्वर --अतिवृष्टीमुळे महाबळेश्वर तालुक्यात दरडी कोसळण्याच्या घटना वारंवार घडत असतात. या नैसर्गिक आपत्तीमुळे नागरिकांसह पर्यटकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. पावसाळा आला की नागरिकांना पाऊसपाण्यापेक्षा दरडी कोसळण्याचीच भीती अधिक असते. तालुक्यातील माचूतर गावाजवळ पंधरा दिवसांपूर्वी कोसळलेली महाकाय दरड अजून जैसे थेच आहे. यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, शनिवारी शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला.
महाबळेश्वरपासून सात किलोमीटर अंतरावर महाबळेश्वर-मेढा-सातारा मार्गावर माचूतर हे गाव आहे. हे गाव दोन भागांत वसले आहे. गावातील काही भाग रस्त्याच्या कडेला तर बराचसा भाग डोंगर उतारावर वसलेला आहे. डोंगराच्या कुशीत असलेल्या गावावर माळीण गावाप्रमाणे डोंगरकडे कोसळण्याची भीती गेल्या अनेक वर्षांपासून गावातील नागरिक व्यक्त करीत आहेत.
दि. २२ आॅगस्ट रोजी अतिवृष्टीमुळे व ग्रामस्थांनी व्यक्त केलेल्या भीतीप्रमाणे डोंगरकड्याचा काही भाग रस्त्यावरच कोसळला. परिणामी गावाकडे जाणारा मार्ग पूर्णपणे बंद झाला. या रस्त्याने होणारे सर्व दळणवळणही बंद पडले. सुदैवाने गावापासून काही मीटर अंतरावर ही दरड कोसळली त्यामुळे कोणतीही जीवित अथवा वित्त हानी झाली नाही. या दरडीच्या कक्षेत गावातील काही घरे येत होती; परंतु सुदैवाने गडगडत येणाऱ्या दरडीमधील मोठमोठे दगड घरांपासून काही अंतरावर थांबल्याने मोठा अनर्थ टळला. गावाच्या माथ्यावर असलेला कडा जर कोसळला तर या कड्याखाली संपूर्ण गाव गाडले गेले असते. येथील ग्रामस्थ भीतीच्या सावटाखाली आहेत.
माचूतर गावाजवळ दरड कोसळण्याच्या घटनेला तब्बल १५ दिवसांचा कालावधी उलटून गेला असून, प्रशासनाच्या वतीने अद्याप कोणत्याही दरड हटविण्यासाठी कोणतेही पाऊल उचलले नाही. दरम्यान, शनिवारी प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांनी शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख नंदकुमार घाडगे, उपजिल्हा प्रमुख राजेश कुंभारदरे, पंचायत समितीचे माजी सभापती धोंडिराम बापू जाधव, नगरसेवक संतोष शिंदे, शिवसेनेचे तालुका प्रमुख यशवंत घाडगे, अतुल सलागरे यांच्या समवेत घटनास्थळी भेट देऊन दरडीची पाहणी केली. यावेळी माचूतरचे सरपंच नारायण शिंदे व ग्रामस्थांनी मागण्यांचे निवेदन सादर केले.


पुनर्वसनाबाबत पाठपुरावा करू : बानुगडे
‘ग्रामस्थांनी व्यक्त केलेल्या भीतीप्रमाणे गावावर दरड कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा स्थितीत गावाचे पुनर्वसन करण्याची मागणी चुकीची म्हणता येणार नाही. आपण हे निवेदन पालकमंत्री विजय शिवतारे यांच्यापर्यंत पोहोचवून ग्रामस्थांच्या भावना त्यांना कळवू व पुनर्वसना संदर्भात योग्य तो निर्णय शासनाच्या वतीने घेण्यात येईल,’ असे आश्वासन प्रा. बानुगडे-पाटील यांनी यावेळी ग्रामस्थांना दिले.


ग्रामस्थांची रात्र
जागून
माचूतर येथे दरड कोसळून आठवडा झाला तरी ती दरड हटविण्याची तसदी संबंधित खात्याने घेतली नाही. ही बाब अत्यंत गंभीर आहे. कधी ऊन तर कधी पाऊस पडत असल्याने ग्रामस्थांना सतत दरडी कोसळण्याची भीती वाटत आहे. या भीतीपोटी गावातील लोक रात्रभर जागे राहत आहेत. कोणत्याही क्षणी दरड कोसळेल या भीतीने ग्रामस्थांची झोप उडाली आहे.

Web Title: Fifteen days after the risk of tremors!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.