सातारा : एका एकरात पंधरा लाखांचे आले!, दुष्काळी परिस्थितीवर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 11:53 AM2018-11-16T11:53:42+5:302018-11-16T11:55:27+5:30
खटाव तालुक्यातील औंध येथील एका युवा शेतकऱ्याने एका एकरावर लागण केलेल्या आले पिकाचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. या उत्पादित सर्व आल्याचा बाजारभावाने पंधरा लाख रुपये मिळणार आहेत. दुष्काळी पट्ट्यात काढलेल्या या विक्रमी उत्पादनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
औंध : खटाव तालुक्यातील औंध येथील एका युवा शेतकऱ्याने एका एकरावर लागण केलेल्या आले पिकाचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. या उत्पादित सर्व आल्याचा बाजारभावाने पंधरा लाख रुपये मिळणार आहेत. दुष्काळी पट्ट्यात काढलेल्या या विक्रमी उत्पादनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
औंध येथील उमेश गोविंद जगदाळे हे गेली अनेक वर्षे शिकूनही नोकरी न लागल्याने आपल्या घरची शेती करतात. त्यांनी या वेळेस आले पिकाची लागण केली. त्यानंतर वेळच्या वेळी लक्ष देऊन त्यांनी वर्षभर पिकाची निगा राखली. पिकास आवश्यक त्यावेळी खते, कीटकनाशके भर टाकणे, भांगलण यासह इतर मशागतीची कामे त्यांनी वेळेत केल्याने विक्रमी उत्पादन त्यांच्या पदरात पडले. मजुरांच्या टीमबरोबर अख्खं कुटुंब शेतात काम करीत असते.
फायदा, तोटा याचा विचार पीक लागण करण्यापासूनच कोणी करू नये, आपले पीक दर्जेदार व उत्तम येण्यासाठी काय करावे, याचे नियोजन डोक्यात ठेवणे आवश्यक आहे. कोणत्याही पिकास जीव लावून कष्ट केले. सुयोग्य नियोजन केले तरी माझ्यापेक्षा अनेकजण या दुष्काळी खटाव तालुक्यात विक्रमी उत्पादन घेतील.
-उमेश जगदाळे,
शेतकरी, औंध