पाचशे झाडे लावून आईला वाहिली आदरांजली
By admin | Published: July 8, 2017 09:59 PM2017-07-08T21:59:41+5:302017-07-08T22:01:13+5:30
भोसले कुटुंबीयांचे अनोखे मातृप्रेम : राजाळेत १५ वर्षांत पाच हजार झाडांची लागवड अन् संगोपन
लोकमत न्यूज नेटवर्क
फलटण : शासनाच्या चार कोटी वृक्षलागवड योजनेचे औचित्य साधून निवृत्त सनदी अधिकारी विश्वासराव भोसले व त्यांच्या कुटुंबीयांनी आपल्या आईच्या दशक्रिया विधीदिनी आदरांजली म्हणून पाचशे विविध प्रकारच्या झाडांची लागवड करून ते जोपासण्याचा संकल्प केले.
राजाळे, ता. फलटण येथील पार्वतीबाई जयंवतराव भोसले यांचे नुकतेच निधन झाले. त्या महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे माजी अध्यक्ष विश्वासराव भोसले यांच्या मातोश्री होत्या. पार्वतीबाई भोसले या शेतकरी कुटुंबातील आणि निसर्गप्रेमी असल्याने त्यांनी आपल्या कुटुंबाच्या माध्यमातून राजाळे गावात गेल्या १५ वर्षांपासून सुमारे पाच हजार विविध प्रकारची झाडे लावली असून, त्यांचे संरक्षण व संवर्धन उत्तम प्रकारे केले आहे. आपल्या मातोश्रीची इच्छा आणि त्यांची आवड लक्षात घेऊन वनविभाग राजाळे, ग्रामपंचायत, जानाई हायस्कूल व ग्रामस्थांच्या सहकार्याने आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केले. आवडीची जोपासना करीत त्यांच्या मुुलांनी दशक्रिया विधीनंतर राजाळे परिसरात विविध प्रकारची झाडे लावून एक आगळी वेगळी श्रद्धांजली आपल्या आईला वाहिली केवळ वृक्षारोपण न करता ती संगोपन करून मोठी करण्याचा मानस यावेळी विश्वासराव भोसले यांनी केला.
विविध प्रकारचे झाडे..
गेल्या पंधरा वर्षांपासून वृक्ष लागवड करताना वनविभाग राजाळे, ग्रामपंचायत, जानाई हायस्कूल तसेच ग्रामस्थांचा यामध्ये मोठ्या प्रमाणात हातभार लागत आहे. या सर्वांच्या माध्यमातून परिसरात विविध प्रकारचे सुमारे पाच हजार झाडांची लागवड करण्यात आली आहे. तसेच झाडांची संगोपनही केली जाते.