शिष्यवृती गुणवत्ता यादीत सातारचे अर्धशतक
By admin | Published: June 30, 2017 02:01 PM2017-06-30T14:01:05+5:302017-06-30T14:01:05+5:30
जिल्ह्यातील पन्नास विद्यार्थ्यांचे यश
आॅनलाईन लोकमत
सातारा , दि. ३0 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (पाचवी)व पूर्व माध्यमिक (आठवी) शिष्यवृत्ती परीक्षेत राज्याच्या गुणवत्ता यादीत सातारा जिल्ह्यातील पन्नास विद्यार्थ्यांनी स्थान मिळवले आहे.
वडुज ता. खटावच्या छत्रपती शिवाजी हायस्कुलच्या कष्णुर शेख हिने पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत ग्रामीण भागात ९३.९५ टक्के मिळवून राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. या शाळेतील एकूण ६९ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती मिळवत जिल्ह्यात झेंडा फडकावला आहे. तर पूर्व माध्यमिक मध्ये ३०.५८ टक्के तर पूर्व माध्यमिकमध्ये १४.५७ टक्के विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत, अशी माहिती शिक्षण अधिकारी पुनीता गुरव यांनी दिली.
पूर्व उच्च प्राथमिक (पाचवी) मध्ये जिल्ह्यातील १ हजार ७७१ शाळांमधील १९ हजार ९१९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली . ६ हजार १४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यापैकी ४७४ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली. तर राज्याच्या गुणवत्ता यादीत शहरी विभागात जिल्ह्यातील १७ विद्यार्थी तर ग्रामीण विभागात ८ विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले. तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्तीत (आठवी) परीक्षेसाठी जिल्ह्यातील ८२६ शाळांमधील १७ हजार ५८ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी २ हजार ५२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर ४५७ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली. या परीक्षेत राज्याच्या गुणवत्ता यादीत शहरी ६ तर ग्रामीण विभागात १९ विद्यार्थ्यांनी बाजी मारली. शिष्यवृत्तीच्या जावळी पॅटर्न म्हणून ओळख असणाऱ्या जावळीतील एकही विध्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत यंदा चमकला नाही.
गेल्या अनेक वर्षांपासून जावळीतील विद्यार्थी हे राष्ट्रीय, राज्य गुणवत्ता यादीत चमकत आले आहेत. शिष्यवृत्तीचा जावळी पॅटर्न राज्यात गाजला आहे. मात्र यावर्षी जावळीतील एकही विध्यार्थी राष्ट्रीय,राज्य गुणवत्ता यादीत चमकला नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.