पन्नास लाखाच्या गोदामाचा मुहूर्त कुठाय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 09:56 PM2018-06-29T21:56:10+5:302018-06-29T21:57:14+5:30
शासकीय धान्याचा साठा करण्याची व्यवस्था असणारे पाटण येथील जुने गोदाम मोडकळीस आले आहे. त्यामुळे याठिकाणी ठेवण्यात येणाऱ्या हजारो पोती धान्याची उंदीर आणी घुशी नासाडी करत आहेत
पाटण : शासकीय धान्याचा साठा करण्याची व्यवस्था असणारे पाटण येथील जुने गोदाम मोडकळीस आले आहे. त्यामुळे याठिकाणी ठेवण्यात येणाऱ्या हजारो पोती धान्याची उंदीर आणी घुशी नासाडी करत आहेत. ही नासाडी रोखण्यासाठी शिरळ येथे दोन वर्षांपूर्वीच ५० लाख रुपये खर्चून गोदाम बांधण्यात आले आहे. मात्र, उद्घाटनाचा मुहूर्त सापडत नसल्याने हे गोदाम अद्याप सुरू करण्यात आलेले नाही.
पाटण तालुक्याच्या पश्चिमेकडील म्हणजे कोयना, मोरगीरी, मणदुरे आणि पाटण, चाफळ या विभागांतील शेकडो रेशन दुकानदार पाटण येथील जुन्या शासकीय गोदामामधून धान्य उचलतात. अनेक वर्षांपूर्वी बांधलेल्या या जुन्या गोदामाची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. गहू, तांदूळ, साखर आणि इतर माल ठेवण्यास हे जुने गोदाम अपुरे पडत आहे. त्यामुळे शिरळ येथे सर्व सोयींनीयुक्त नवीन गोदाम शिरळ येथे बांधून ठेवले आहे. याठिकाणी सीसीटीव्ही, वीज, डांबरी रस्ते आदी सुविधा आहेत. सर्व सोयींनी हे नवीन गोदाम सज्ज करण्यात आहे. मात्र, तरीही ते गोदाम सुरू करण्यास पाटण तहसील कार्यालय पुढाकार घेत नाही. केवळ मतमोजणीसाठीच या नवीन गोदामाचा वापर केला जात आहे.
पाटण तालुक्यातील ग्रामपंचायत, नगरपंचायत, कारखान्यासह अन्य निवडणुका चुरशिने पार पडतात. निवडणुका झाल्यानंतर यापुर्वी मतमोजणी कुठे करायची, असा प्रश्न निर्माण होत होता. आता शिरळ येथील नविन गोदाम त्यासाठी वापरले जात आहे. आत्तापर्यंत साखर कारखाना आणि पाटण नगरपंचायतीची मतमोजणी या गोदामात घेतली होती. या गोदामास आजअखेर कुलुप लावलेले आहे.
पुरवठा निरीक्षकांकडून पाहणी
शिरळचे गोदाम सुरू करण्यासाठी मध्यंतरी जिल्हा पुरवठा निरीक्षक यांनी गोदाम तपासणी केली होती. या पाहणीनंतर गोदाम वापरले जाण्याची शक्यता होती. त्यासाठी काही प्रमाणात कार्यवाहीसुद्धा करण्यात आली. मात्र, त्यानंतर एक वर्ष होऊन गेले तरीसुद्धा आजअखेर नवीन गोदामाचा वापर सुरू करण्यात आलेला नाही. जुन्या गोदामातच धान्यसाठा केला जात आहे.
नव्या गोदामाची मोडतोड सुरू
लाखो रुपये खर्चून बांधलेल्या नवीन गोदामास देखभाल करण्यासाठी तहसील कार्यालयाने सुरक्षारक्षक किंवा शिपाई नेमलेला नाही. त्यामुळे नवीन गोदामाची समाजकंटकांकडून मोडतोड सुरू आहे. सीसीटीव्ही, खिडकी, काचा, वीज दिव्यांची मोडतोड केली आहे. गोदाम वापरण्यासाठी या सर्वाची दुरुस्ती करावी लागणार आहे.
शिरळ येथील नवीन गोदामासाठी आवश्यक असणारे किपरचे पद रिक्त आहे. त्यामुळे ते गोदाम बंद ठेवण्यात आले आहे. गोदाम किपरची नेमणूक झाल्यानंतर त्वरित जुन्या गोदामातील धान्यसाठा त्याठिकाणी हलवला जाणार आहे. सध्या पाटण, ढेबेवाडी, तारळे येथील तीन जुन्या गोदामांचा वापर करण्यात येत आहे.
- रामहरी भोसले तहसीलदार, पाटण
नवीन गोदामामध्ये साठा केलेला नाही. गोदामात १ हजार ८० मेट्रिक टन साठा होऊ शकतो. त्यामुळे जुन्या गोदामाचा वापर केला जात आहे. जुन्या गोदामाची साठवण क्षमता ५०० मेट्रिक टन आहे.
- एम. एस. अष्टेकर पुरवठा निरीक्षक, पाटण