पन्नास टक्के गाड्या अजूनही आगारातच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:26 AM2021-06-25T04:26:58+5:302021-06-25T04:26:58+5:30
सातारा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून सातारा जिल्हा सावरत असल्याने काही प्रमाणात निर्बंध शिथील केले आहेत. त्यामुळे शहरात विविध कामानिमित्ताने ...
सातारा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून सातारा जिल्हा सावरत असल्याने काही प्रमाणात निर्बंध शिथील केले आहेत. त्यामुळे शहरात विविध कामानिमित्ताने येणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. सार्वजनिक प्रवासी वाहतुकीला परवानगी दिली आहे. मात्र, अजूनही पन्नास टक्के गाड्या आगारातच उभ्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना वडापचाच आधार आहे.
राज्य परिवहन महामंडळाला प्रवासी वाहतुकीला प्रशासनाने परवानगी दिली आहे. त्यानंतर सातारा विभागाने पूर्ण क्षमतेने वाहने चालविण्याचे नियोजन केले. सातारा आगाराने सातारा - स्वारगेट, सातारा - बोरिवली, सातारा - मुंबई या मार्गांवर जास्त लक्ष केंद्रीत केले आहे. सातारकर आणि पुणे, मुंबईचा जवळचा संबंध आहे. साताऱ्यातील प्रत्येक गावातून असंख्य तरुण शिक्षण, व्यवसाय, नोकरीनिमित्ताने याठिकाणी स्थायिक झाले आहेत.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत एस. टी.च्या फेऱ्या साधारणत: सात महिने बंद होत्या. त्यामुळे या मंडळींना गावी येता आले नव्हते. त्यानंतर दुसऱ्या लाटेत अनेकांची रक्ताची माणसं सोडून गेली. काहीजण आजारी पडली, लग्न झाले पण कोणालाही भेटता आले नव्हते. त्यामुळे पुणे, मुंबईहून साताऱ्यात येणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. साहजिकच एस. टी.नेही याच मार्गावर जास्त लक्ष केंद्रीत केले आहे.
ग्रामीण भागात एस. टी. कधी सुरू होणार?
सातारा आगारासह विभागातील सर्वच आगारांतून पुणे, मुंबई, बोरिवली, कोल्हापूर, नाशिक या लांबपल्ल्याच्या फेऱ्या वाढविल्या आहेत. त्यातून उत्पन्न वाढण्याची संधी एस. टी. महामंडळाला जास्त दिसत आहे.
ग्रामीण फेऱ्यांच्या सर्वाधिक उत्पन्नाचे साधन हे विद्यार्थी वाहतूक असते. त्यातून उत्पन्न मिळते. पण शाळा-महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थी घरातच आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात एस. टी.च्या फेऱ्या कमीच आहेत.
डिझेलचे दर दररोज वाढत आहेत. या परिस्थितीत कमी माणसांसाठी एस. टी. सोडणे सध्या तरी शक्य होत नाही. साहजिकच ग्रामीण भागात फेऱ्या कमी आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात एस. टी. कधी सुरू होणार ना? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
चौकट
प्रवाशांना खासगी वाहनांचाच आधार
साताऱ्यात परळी खोऱ्यातून दररोज मोठ्या संख्येने नागरिक विविध कामानिमित्ताने येत असतात. मात्र, एस. टी.च्या फेऱ्या पुरेशा नसल्याने नागरिकांना वडापचाच आधार घ्यावा लागतो.
पुणे - बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या मात्र साताऱ्यापासून काही किलोमीटर अंतरावरील लहान गावांमध्ये अजूनही एस. टी. थांबत नाही. महामार्गावरुन लांबपल्ल्याच्याच गाड्या धावत असतात. त्यामुळे या मार्गावरील नागरिकांनाही वडापचा आधार घ्यावा लागतो.
प्रतिक्रिया
वडापमध्ये कोरोनाची भीती
वडापमधून क्षमतेपेक्षा जादा प्रवासी वाहतूक केली जाते. त्यामुळे कोरोना आणखी वाढण्याचा धोका कायम आहे. यामध्ये आपल्याजवळ बसलेली व्यक्ती कोठून कोठून आलेली असेल, हे ही कळत नाही. त्यामुळे आपण कितीही काळजी घेतली तरी कोरोना तर घरी नेणार नाही ना, अशी भीती वाटत असते.
- सागर कुंभार, प्रवासी.
एस. टी. महामंडळाला ग्रामीण भागातून पुरेसे प्रवासी मिळत नाहीत. त्यामुळे ते तरी कसे वाहन चालविणार हा प्रश्न आहे. मात्र, खासगी प्रवासी चालकांनी क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेतल्याने अपघाताचा धोका आहे. त्यापेक्षाही कोरोनाचा जास्त धोका आहे. यामुळे स्वत:सोबत चालकांचे कुटुंबीयही अडचणीत येऊ शकतात.
- प्रशांत माने, प्रवासी.
सर्व आकडेवारी देणार आहे...