तब्बल पन्नास वर्षांनी झाली वर्गमित्रांची गळाभेट!
By admin | Published: January 25, 2016 12:46 AM2016-01-25T00:46:34+5:302016-01-25T00:46:34+5:30
आठवणींना उजाळा : अनंत इंग्लिश स्कूलमधील शाळूसोबतींच्या स्नेहमेळाव्यात आनंदाश्रूंनी पाणावले डोळे
सातारा : मॅट्रिक झाल्यानंतर सर्वांच्या वाटा वेगळ्या झाल्या. ‘पुन्हा भेटू’ असं म्हणून प्रत्येकानं एकमेकांचा निरोप घेतला. एका मागे एक वर्ष सरत गेले आणि पन्नास वर्षांचा काळ लोटला. जुन्या वर्गमित्रांना आपण ‘पुन्हा भेटू,’ असं कुणाच्या स्वप्नातही नसावं; परंतु हे स्वप्न खरं झालं. शाळेतील काही मित्रमंडळींनी पुढाकार घेऊन पन्नास वर्षांपूर्वी वेगळ्या झालेल्या आपल्या मित्रांना स्नेहमेळाव्याच्या निमित्तानं एकत्र आणलं. यावेळी आपल्या वर्गमित्रांना पाहून सर्वांचेच डोळे आनंदाने पाणावले.
साताऱ्यातील अनंत इंग्लिश स्कूलचे पूर्वीचे नाव पॉप्युलर इंग्लिश स्कूल. या शाळेतून १९६५-६६ मध्ये सुमारे १३० विद्यार्थी मॅट्रिक होऊन बाहेर पडले. पुढील शिक्षणासाठी बाहेर पडताना सर्वांनी ‘आपण पुन्हा भेटू,’ या आशेवर निरोप घेतला. सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी वेगेवगळ्या वाटा शोधत राज्यात विखुरले गेले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर यापैकी कोणी डॉक्टर झाले, तर काही शिक्षक, वकील, इंजिनिअर, कर्नल, फोटोग्राफर तर काही सरकारी सेवेत रुजू झाले.
पन्नास वर्षांपूर्वी वेगळे झाल्यानंतर आपल्या वर्गमित्रांशी पुन्हा भेट होईल, याची पुसटशी कल्पनाही कुणाला नसावी. मात्र, साताऱ्यात राहणाऱ्या अशोक पंडित (वय ६५) यांनी आपल्या जुन्या मित्रांची भेट घडवून आणण्याचा निर्धार केला. गेल्या तीन महिन्यांपासून त्यांनी शाळेतून मिळविलेल्या माहितीच्या आधारे वर्गमित्रांची नावे आणि त्यांचा पत्ता या माध्यमातून शोधमोहीम सुरू केली. जवळपास सर्वांचेच मोबाईल क्रमांक त्यांना मिळाले. यापैकी ८० मित्र-मैत्रिणींशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांना स्नेहमेळाव्यासाठी निमंत्रित केले.
साताऱ्यातील एका हॉलमध्ये रविवारी (दि. २४) ८० वर्गमित्र स्नेहमेळाव्यासाठी एकत्र आले. सुरुवातीला कोणी कोणाला ओळखलेच नाही; मात्र जेंव्हा एकमेकांची ओळख करून देण्यात आली; तेव्हा सर्वजण अवाक् झाले. आपल्या वर्गमित्रांना भेटून प्रत्येकजण गहिवरले. त्यावेळी दिलेला ‘आपण पुन्हा भेटू,’ चा शब्द आज अनपेक्षितरीत्या खरा ठरला याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. पन्नास वर्षांपूर्वीचा वर्गच जणू पुन्हा एकदा भरला असल्याची प्रचिती यावेळी उपस्थित प्रत्येकाला आली. गप्पा-गोष्टी, गाणी आणि हास्यविनोदाच्या मैफलीत हा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. ‘सुहाना सफर और ये मौसम हसी’ या गाण्याने निरोप घेताना सर्वांचे डोळे पुन्हा एकदा पाणावले. (प्रतिनिधी)
दिवंगतांना श्रद्धांजली
स्नेहमेळाव्याला ८० वर्गमित्र उपस्थित होते. मात्र अनेकांची अनुपस्थिती यावेळी जाणवत होती. अनुपस्थित असणाऱ्या आपल्या काही मित्रांनी या जगाचा निरोप घेतला आहे, ही गोष्ट जेव्हा सर्वांना कळाली तेव्हा सर्वांनी ‘त्या’ मित्रांना श्रद्धांजली वाहिली.
सोबतीला ‘फोटो अल्बम’
या स्नेहमेळाव्याला आलेल्या काहीजणांनी आपल्यासोबत लग्नाचा फोटो अल्बमही आणला होता. लग्न कसे झाले, कुठे झाले, तरुणपणी मी असा दिसत होतो, अशा अनेक गोष्टी फोटोच्या माध्यमातून ऐकमेकांना सांगितल्या.