युवकांचा पॉकेटमनी देणार दुष्काळाशी लढा
By admin | Published: February 13, 2015 12:01 AM2015-02-13T00:01:04+5:302015-02-13T00:49:48+5:30
इंजबाव : तरूणाईनं पहिल्या टप्प्यात जमा केला दहा हजारांचा निधी--लोकमत विशेष...
फिरोज तांबोळी - गोंदवले -आधुनिक काळात स्वच्छंदाबरोबरच खर्चिक बनलेली तरुणाई पाहायला मिळते; पण हीच तरुणाई विकासकामांसाठी एकवटली तर काहीही अशक्य नाही, हे इंजबाव, ता. माण येथील तरुणांनी दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. गावातील दुष्काळ कायमस्वरूपी हद्दपार करण्यासाठी युवकांनी दरमहा शंभर रुपये काढण्याचा निर्णय घेतला असून, पहिल्याच टप्प्यात सुमारे दहा हजारांचा निधीही जमा झाला आहे.
माणच्या खडकाळ, डोंगराळ भागात इंजबाव गाव बसले असून, अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिले आहे. पाण्यासाठी आसुसलेल्या या गावाला दुष्काळाची पहिली झळ सोसावी लागते, ही वस्तुस्थिती आहे. मागासलेला भाग, लोकसहभागाचा अभाव या प्रमुख कारणाने गावाचा पाणीप्रश्न कधी सुटणार हाच गावकऱ्यांचा मूळ प्रश्न आहे. परंतु गावातील सुशिक्षित तरुणांनी ही वस्तुस्थिती बदलण्याचा ध्यास घेतला आहे. त्यासाठी इंजबाव विकास संस्था उभारण्यासाठी संतोष कापसे यांच्या पुढाकाराने स्थानिकांसह पुणे, मुंबईत याठिकाणी स्थायिक झालेले गावचे तरुण देखील पुढे सरसावले आहेत.
गेल्या काही दिवसांपूर्वीच या तरुणांनी गावाच्या विकासाबाबत आराखडा आखून कामाला प्रत्यक्षात सुरुवातही केली आहे.
याबाबत ‘लोकमत’मध्ये ‘विकासासाठी एकवटली तरुणाई’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताने तरुणांना प्रोत्साहन मिळालेच; परंतु गावासाठी दरमहा शंभर रुपये या उपक्रमाची माहितीही मिळाली. या उपक्रमात इतरांना सहभागी करून घेण्यासाठी आता तरुणांनी पुढाकार घेतला आहे. मूळचे इंजबाव गावचे रहिवासी असलेले विठ्ठल कापसे यांच्या संकल्पनेतून उदयास आलेल्या या उपक्रमात मुंबईस्थित सुमारे ७० तरुणांनी सहभाग होण्याची तयारी दाखविली आहे. शिवाय गावातील स्थानिक ३० तरुणदेखील यासाठी सरसावले आहेत.
दरमहा केवळ शंभर रुपये दिल्यास कायमचा दुष्काळ हटविण्यासाठी आपले योगदान मोलाचे ठरू शकणार आहे. पहिल्याच टप्प्यात सुमारे दहा हजारांचा निधी जमा झाला आहे.
गावाचा विकास महत्त्वाचा
महिनाभरात अकारण पैसे वाया जातच असतात. पंरतु गावाच्या विकासासाठी असे वाया जाणारे पैसे सत्कारणी लागत असतील, तर शंभरच नव्हे तर त्याहून अधिक रुपये देण्यासही अनेक तरुण पुढे येत आहेत.
-संतोष कापसे,
इंजबाव विकास संस्था, अध्यक्ष
इंजबावच्या विकासासाठी आम्ही मित्र एकत्र येऊन प्रयत्न सुरू केले. यातूनच दरमहा शंभर रुपये गावासाठी ही संकल्पना सुचली. ही संकल्पना ज्ञात-अज्ञात लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘लोकमत’ची मोलाची साथ मिळाल्यानेच पहिल्या टप्प्यात सुमारे शंभर तरुणांनी या संकल्पनेत सहभाग दिला. त्यामुळे ‘लोकमत’चे आभारी आहोत.
-विठ्ठल कापसे,मुंबई स्थित तरुण