मातीसाठी लढलो; आता जातीसाठी लढूया !
By admin | Published: September 11, 2016 12:05 AM2016-09-11T00:05:00+5:302016-09-11T00:26:11+5:30
कऱ्हाडातल्या बैठकीत मराठा बांधवांचा निर्धार : सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते अन् सामान्य नागरिकांचाही उत्स्फूर्त सहभाग--मराठा क्रांती बैठकीतून...
प्रमोद सुकरे -- कऱ्हाड -मराठा समाजाला खूप मोठा इतिहास आहे. मातीसाठी लढणारा मावळा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात; पण दुर्दैवाने आज त्यांच्यावरच वाईट वेळ आली आहे. त्यामुळे आजवर मातीसाठी लढलो, आता राजकीय पक्ष, संघटना यांचे जोडे बाजूला ठेवून एकदा जातीसाठी लढूया, असा निर्धार कऱ्हाड येथील मराठा समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत स्पष्ट करण्यात आला.
कऱ्हाड येथे सोनाई मंगल कार्यालयात सातारा येथील नियोजित मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अॅड. भरत पाटील, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रामभाऊ रैनाक, तालुकाध्यक्ष नितीन काशिद, एनएसयुआयचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राज्यसचिव अॅड. दीपक थोरात, मलकापूर नगरपंचायतीचे बांधकाम सभापती राजेंद्र यादव, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन नलवडे, अनिल घराळ, सचिन पाटील, जॉण्टी थोरात, अनिल नाईगडे, संजय पिसाळ, चारूदत्त पाटील, अॅड. नरेंद्र पाटील, सरपंच राजेंद्र पाटील, किरण पाटील, महेश खुस्पे, विकास पाटील, भूषण जगताप यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
यावेळी अॅड. भरत पाटील म्हणाले, ‘आज या बैठकीला आलेले सगळे मराठा म्हणून आलेले आहेत. आपल्या समोरचे प्रश्न आपल्याला माहिती आहेत. ते मार्गी लावण्यासाठी एका दिशेने, एका विचाराने जाणे गरजेचे आहे. त्यासाठी आपली एकजूट महत्त्वाची असून, साताऱ्याचा नियोजित मराठा क्रांती मोर्चा ऐतिहासिक करून दाखवूया.’
अनिल घराळ म्हणाले, ‘अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करा ही आपली प्रमुख मागणी आहे. तर मराठ्यांना आरक्षण मिळावे ही पण आपली महत्त्वाची भूमिका आहे. आपल्या मोर्चा पाठीमागचा उद्देश आपण तळागाळापर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे.
महेश खुस्पे म्हणाले, ‘कोणतेही उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी एकजूट ही महत्त्वाची असते. मराठा समाजाने आपली एकजूट दाखविली तर त्यांचे प्रश्न मिटायला कोणतीही अडचण येणार नाही. मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्ताने ती वेळ चालून आली असून, या मोर्चात मराठ्यांनी लाखोच्या संख्येने सहभागी झाले पाहिजे.’ विकास पाटील म्हणाले, ‘बीड, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेने मराठा समाज कमी आहे. येथील समाजावर होणारे अन्याय सहन होण्यासारखे नाहीत. त्यामुळे तेथील मराठा समाज पेटून उठला आहे. कोणताही पक्ष, नेता यांची वाट न बघता समाजबांधव एकवटले आहेत.
सोमवारी पुन्हा
कऱ्हाडात नियोजन बैठक
सातारा व कऱ्हाड या दोन्ही ठिकाणी मराठा क्रांती मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यासाठी वेळ कमी असून, पुढील नियोजन करण्यासाठी सोमवारी सकाळी अकरा वाजता सोनाई मंगल कार्यालय मलकापूर कऱ्हाड येथे पुन्हा नियोजन बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी अनेकांनी केले.
साताऱ्यात आज नियोजन बैठक
सातारा येथील मराठा क्रांती मोर्चा यशस्वी करण्यासाठी रविवार, दि. ११ रोजी दुपारी १२ वाजता स्वराज्य मंगल कार्यालय येथे प्रदीर्घ विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत बीड, उस्मानाबाद येथील मराठा क्रांती मोर्चा यशस्वी केलेले लोक जिल्ह्यातील लोकांना मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीलाही कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले.
घराघरांत मावळे तयार करा..!
‘शेजारच्या घरात छत्रपती शिवाजी जन्माला यावेत. हे विचार आता सोडून द्या. मराठ्यांवरील अन्याय दूर करण्यासाठी आता घराघरांतच मावळे तयार करण्याची गरज आहे,’ असे मत मलकापूर नगरपंचायतीचे बांधकाम सभापती राजेंद्र यादव यांनी व्यक्त केले. त्याला उपस्थितांनी ‘जय शिवाजी, जय भवानी’च्या घोषणा देत प्रतिसाद दिला.
स्वखर्चाने विद्यार्थी घेऊन येणार...
‘महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी युवक काँगे्रसचे सचिव व येथील स्वराज्य एज्युकेशन सोसायटीचे सचिव अॅड. दीपक थोरात यांनी माझ्या महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असलेल्या मराठा समाजातील सर्व विद्यार्थी, विद्यार्थ्यांना साताऱ्याच्या मोर्चासाठी स्वखर्चाने आपल्या स्कूल बसमधून घेऊन येणार असल्याचे जाहीर केले व इतरांनीही कोणीतरी आपल्यावर जबाबदारी टाकण्याची वाट न पाहता स्वत:च अशाप्रकारे जबाबदारी घ्यावी,’ असे आवाहन केले.