उदयनराजे अन् श्रीनिवास पाटील यांच्यातच लढत-: दोन माजी खासदारांमध्येच रंगणार सामना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2019 11:18 PM2019-10-01T23:18:47+5:302019-10-01T23:20:46+5:30

लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरून झाल्यानंतर राष्ट्रवादीचे उमेदवार मकरंद पाटील वाई विधानसभा मतदारसंघातून, तर सत्यजित पाटणकर पाटण विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील.

Fighting between Udayanaraje and Srinivas Patil | उदयनराजे अन् श्रीनिवास पाटील यांच्यातच लढत-: दोन माजी खासदारांमध्येच रंगणार सामना

उदयनराजे अन् श्रीनिवास पाटील यांच्यातच लढत-: दोन माजी खासदारांमध्येच रंगणार सामना

Next
ठळक मुद्देराष्ट्रवादीचा पत्ता ओपन -आता राष्ट्रवादीही तोडीस तोड शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे.

सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीमध्ये सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्याविरुद्ध माजी खासदार उदयनराजे भोसले असा सामना रंगणार आहे. राष्ट्रवादी-काँगे्रस व मित्र पक्षांच्या आघाडीतर्फे श्रीनिवास पाटील दि. ३ रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

या पोटनिवडणुकीसाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी देण्याचे नियोजन राष्ट्रवादी व काँग्रेस यांच्या आघाडीतर्फे करण्यात आले होते. ही उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू होत्या; परंतु पृथ्वीराज चव्हाण यांनी क-हाड दक्षिण मतदारसंघात विधानसभा लढविण्याचा निर्णय घेतल्याने मंगळवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीसाठी श्रीनिवास पाटील यांच्या नावाची घोषणा केली.

खा. शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांना मंगळवारी सकाळी फोन करून श्रीनिवास पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी करा, अशी सूचना केली आहे. ३ आॅक्टोबर रोजी पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहे. राष्ट्रवादीचे विधानसभेसाठी इच्छुक असलेले सगळे उमेदवार यावेळी उपस्थित राहणार आहेत. लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरून झाल्यानंतर राष्ट्रवादीचे उमेदवार मकरंद पाटील वाई विधानसभा मतदारसंघातून, तर सत्यजित पाटणकर पाटण विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील.

दरम्यान, ४ आॅक्टोबर रोजी रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमासाठी खासदार शरद पवार उपस्थित राहणार आहेत. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पवार ४ तारखेला प्रमुख कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. शशिकांत शिंदे हे आपला उमेदवारी अर्जही ४ तारखेला शरद पवार यांच्या उपस्थितीत भरणार आहेत.


कोण आहेत श्रीनिवास पाटील?
श्रीनिवास पाटील हे शरद पवार यांचे महाविद्यालयीन काळातील जिवलग मित्र आहेत. या दोघांचे शिक्षण पुण्यात झाले. श्रीनिवास पाटील पुढे सनदी अधिकारी झाले. पवारांच्या आग्रहाखातर जिल्हाधिकारी म्हणून काम करणाऱ्या पाटील यांनी नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेऊन राजकारणात प्रवेश केला. १९९९ मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत कºहाड मतदारसंघातून पाटील यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव केला होता. तसेच २००४ मध्ये झालेल्या निवडणुकीतही पाटील सलग दुसऱ्यांदा लोकसभेत निवडून गेले होते. नंतरच्या पाच वर्षांच्या काळात श्रीनिवास पाटील यांना सिक्कीम राज्याचे राज्यपाल म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती. आता वयाच्या ७९ व्या वर्षी ते लोकसभा निवडणूक लढविणार आहेत.
 

पक्षाध्यक्षांसह प्रदेशाध्यक्ष लावणार हजेरी
श्रीनिवास पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ३ आॅक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष खासदार शरद पवार तसेच प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील हे दोघे उपस्थित राहणार आहेत. पाटील यांनी दि. १ आॅक्टोबर रोजी वाळवा-इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भाजपने उदयनराजेंचा अर्ज दाखल करताना मोठे शक्तिप्रदर्शन केले होते. आता राष्ट्रवादीही तोडीस तोड शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे.

Web Title: Fighting between Udayanaraje and Srinivas Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.