ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 09:06 AM2021-02-05T09:06:13+5:302021-02-05T09:06:13+5:30
वडूज : ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यासह ऊर्जा सचिव व कार्यकारी संचालक यांच्या विरोधात संगनमत करून, मानसिक क्लेश, आर्थिक लुबाडणूक ...
वडूज : ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यासह ऊर्जा सचिव व कार्यकारी संचालक यांच्या विरोधात संगनमत करून, मानसिक क्लेश, आर्थिक लुबाडणूक व फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी केली आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नीलेश देशमुख यांना याबाबतचे लेखी निवेदन मनसेच्या वतीने देण्यात आले.
यावेळी उपजिल्हाध्यक्ष सचिन पवार, जिल्हा रोजगार, स्वयंरोजगार संघटक सूरज लोहार, खटाव तालुकाध्यक्ष दिगंबर शिंगाडे यांची प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
या निवेदनातील अधिक माहिती अशी की, कोरोनाच्या महामारीमुळे महाराष्ट्रात २२ मार्च ते ८ जूनदरम्यान अतिकठोर टाळेबंदी होती. या काळात महावितरणकडून वीज मीटर रीडिंगसाठी प्रतिनिधी पाठविले नाहीत. तसेच वीज बिले वितरित केली नाहीत. या कालावधीत वीज वापरासाठी महावितरणकडून अचानक वापरापेक्षा तिप्पट, चौपट रकमेची बिले पाठविली गेली. या काळात व्यापार उद्योगधंदे बंद होऊन असंख्य लोक बेरोजगार झाले. कर्मचाऱ्यांच्या पगारात २५ ते ५० टक्के कपात करण्यात आली. त्यामुळे वीज बिलांची रक्कम बहुसंख्य नागरिकांना भरणे शक्य नव्हते.
याबाबत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री यांच्याकडे याबाबत तक्रारी मांडल्या.
वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या बैठकाही झाल्या, तर प्रत्येक बैठकीत वीज बिलात कपात करण्याचा निर्णय लवकर घेऊ, असे सांगितले. मात्र, काही दिवसांत ऊर्जामंत्री यांनी अचानक घुमजाव करत वीज ग्राहकांना वीज बिल भरावेच लागेल, असे फर्मान काढले. २० जानेवारीला ग्राहकांना वीज बिलात सवलत देण्यास महावितरणाने नकार दिला व थकीत वीज बिल असणाऱ्या ग्राहकांचे वीज पुरवठा खंडित करण्याचे आदेश दिले.
यामुळे राज्यातील गोरगरीब जनता भयभीत झाली असून, प्रचंड मानसिक आघात व क्लेश पोहोचला आहे. याची सर्वस्वी जबाबदारी आर्थिक लुबाडणुकीचा कट रचणारे राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यासह महावितरण कंपनीचे प्रमुख अधिकारी यांच्या विरोधात फसवणूक, मानसिक आघात पोहोचवण्याचा फौजदारी गुन्हा दाखल करावा, तसेच पुढील काळात दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा निवेदनात देण्यात आला. याप्रसंगी सूरज पवार, चित्रसेन मुके, सागर कट्टे, प्रथमेश नवले, सूरज ढवान, रणजित गलांडे, वैभव यादव, सूरज जानकर, बळीराम राठोड, बाळू पवार, अनिल पवार हे उपस्थित होते.
-------