आरोग्य अधिकाऱ्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:26 AM2021-07-10T04:26:48+5:302021-07-10T04:26:48+5:30
दहिवडी : ‘समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा,’ या मागणीसाठी माण तालुक्यातील समुदाय ...
दहिवडी : ‘समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा,’ या मागणीसाठी माण तालुक्यातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी एकदिवसीय काम बंद आंदोलन केले.
अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजे आरोग्य उपकेंद्रात ६ जुलै रोजी नियमित लसीकरण सुरू होते. त्यावेळी तिथे कार्यरत असणारे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. गणेश शेळके यांनी दुपारी एकच्या सुमारास गळफास लावून लसीकरणाच्या ठिकाणीच आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. ‘तालुका वैद्यकीय अधिकारी व प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यांच्या जाचाला कंटाळून मी आत्महत्या करत आहे’, असे त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे.
या घटनेचा निषेध म्हणून शुक्रवारचे आंदोलन करण्यात आले. यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे, ‘एका होतकरू डाॅक्टरवर वरिष्ठांच्या छळाला कंटाळून आत्महत्या करण्याची वेळ यावी. ही अतिशय दुर्दैवी व संतापजनक घटना आहे. या घटनेचा आम्ही सर्वजण निषेध करतो. या घटनेला जबाबदार अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करुन त्यांना अटक करावी तसेच त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. तसेच या घटनेचा वरिष्ठ पोलीस यंत्रणेकडून सखोल तपास करुन दोषींवर कठोर कारवाई करुन डाॅ. गणेश शेळके यांना न्याय द्यावा’, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेचे राज्याध्यक्ष डाॅ. विजय लोखंडे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. तुषार खाडे, डाॅ. समीना तांबोळी, नम्रता ओंबासे, डाॅ. प्रसाद आवळे, डाॅ. सचिन गाडे, डाॅ. प्रसाद ओंबासे, डाॅ. दिनेश गंबरे, डाॅ. सुजित खाडे, डाॅ. पूनम पुजारी, डाॅ. संजीवनी गोळे, विवेकानंद गिरगावकर, रोहित पाटील व माधुरी कांबळे उपस्थित होते.
चौकट :
डाॅ. गणेश शेळके हा आमचा सहकारी निष्ठूर व मुर्दाड व्यवस्थेचा बळी ठरला आहे. आगामी तीन दिवसात दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास राज्यभर काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे, असा इशारा समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेचे राज्याध्यक्ष डाॅ. विजय लोखंडे यांनी दिला आहे.