अपूर्ण रस्ता ठेवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा

By admin | Published: November 14, 2016 09:17 PM2016-11-14T21:17:13+5:302016-11-15T01:02:24+5:30

खंडाळा तालुका : माथाडी आणि जनरल कामागार युनियनचे निवेदन

File criminal on incomplete road holders | अपूर्ण रस्ता ठेवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा

अपूर्ण रस्ता ठेवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा

Next

शिरवळ : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शिरवळ, ता. खंडाळा गावच्या हद्दीतील चौपाळा याठिकाणी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण व रिलायन्स इंफ्राच्या गलथान कारभाराचा फटका सर्वसामान्य कामगारवर्गाला बसत आहे. औद्योगिक कंपन्यांकडे जाणाऱ्या सेवारस्त्यांचे काम अनेक दिवसांपासून अपूर्णावस्थेत असल्याने याठिकाणी नाईलाजास्तव विरुद्ध दिशेने जाणाऱ्या कामगार वर्गाचे अपघात होऊन अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहे. याबाबत अपघातांना जबाबदार धरून संबंधितांवर गुन्हे दाखल करत अपूर्ण सर्व्हिस रस्ता पूर्ण करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा खंडाळा तालुका माथाडी आणि जनरल कामगार युनियनच्या वतीने खंडाळा तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरीकरणाचे काम सध्या शिरवळ परिसरात अत्यंत संथगतीने सुरू आहे. याठिकाणी प्रमाणात अनधिकृत रस्ता दुभाजक अज्ञातांनी काढल्याने मोठ्या प्रमाणात अपघाताची संख्या याठिकाणी वाढताना दिसत आहे. दरम्यान, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण व रिलायन्स इंफ्राच्या गलथान कारभाराचा फटका शिरवळ भागात असणाऱ्या कंपन्यांमधील सर्वसामान्य कामगारवर्गाला बसत असून, शिरवळजवळील चौपाळा याठिकाणी एका खासगी कंपनीसमोर व एका हॉटेलसमोर गेल्या अनेक दिवसांपासून सर्व्हिस रस्त्यांचे व अर्धवट स्थितीत पुलाचे काम तसेच ठेवण्यात आल्यामुळे याठिकाणी कामगारवर्गाला कंपनीमध्ये जाण्याकरिता विरुद्ध दिशेने कंपनीमध्ये जावे लागते. विरुद्ध दिशेने जात असताना भरधाव वेगाने असलेल्या वाहनांमुळे कामगारांच्या वाहनाचे मोठ्या प्रमाणात अपघात होऊन कामगारांना जीवालाही मुकावे लागले आहे तर काही कामगारांना कायमचे अपंगत्वही आल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत.
दरम्यान, याबाबत वारंवार जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी सक्त सूचना देऊनही याकडे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण व रिलायन्स इंफ्राकडून कानाडोळा करण्यात येत आहे. कंपन्यांमध्ये जाण्यासाठी लवकर येथील सर्व्हिस रस्त्यांचे व अर्धवट स्थितीत असलेल्या पुलाचे काम संबंधितांनी करावे, अशी मागणी कामगारवर्गाने केली असता या मागणीलाही संबंधितांनी वाटाण्याच्या अक्षदा लावल्या असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या अपघातांना जवाबदार असणाऱ्या या ठेकेदारांवर गुन्हा दाखल करून सेवा रस्त्यांचे काम पूर्ण करावे, अशी मागणी कामगारांनी केली आहे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कामगारांच्या वतीने देण्यात आला आहे. (वार्ताहर)


... अन्यथा आंदोलन करणार
शिरवळजवळील चौपाळा याठिकाणी कामगारवर्गाला जाण्याकरिता सर्व्हिस रस्त्याचे काम भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण व रिलायन्स इंफ्राने न केल्यास खंडाळा तालुका माथाडी आणि जनरल कामगार युनियनच्या वतीने खंडाळा तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे. याप्रसंगी निवेदन देताना अध्यक्ष अमीरभाई काझी, सचिव दत्तात्रय ऊर्फ बंडू ढमाळ ,सदस्य मतीन शेख आदी कामगार वर्ग उपस्थित होते.

Web Title: File criminal on incomplete road holders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.