अद्ययावत उद्याने टाकतायत साताऱ्याच्या वैभवात भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 11:32 PM2019-04-17T23:32:23+5:302019-04-17T23:32:29+5:30
सचिन काकडे। लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सातारा शहराच्या वैभवात भर घालणारी येथील उद्याने आता कात टाकू लागली आहेत. ...
सचिन काकडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सातारा शहराच्या वैभवात भर घालणारी येथील उद्याने आता कात टाकू लागली आहेत. कल्याणी शाळेजवळील उद्यान महाराष्ट्रातील पहिले आयुर्वेदिक गार्डन म्हणून नावारुपास येत असताना शहरातील इतर उद्यानेही नगरपालिकेच्या वतीने अद्ययावत करण्यात आली आहेत. अनेक वर्षांनंतर उद्यानांचे रूप बदलल्याने सातारकरांमधूनही समाधान व्यक्त होत आहे.
सातारा शहरात सुमित्राराजे उद्यान, आयुर्वेदिक गार्डन, गुरुवार बाग, प्रतापसिंह उद्यान व हुतात्मा उद्यान ही पाच प्रमुख उद्याने आहेत. देखभाल व दुरुस्तीअभावी या उद्यानांना अवकळा लागली होती. त्यातील खेळणी गंजून गेली होती. तर कोणत्याच उद्यानात नव्याने वृक्षारोपणही करण्यात आले नव्हते. याबाबत नागरिकांमधूनही नाराजी व्यक्त केली जात होती. या सर्व उद्यानांना आलेली अवकळा दूर करण्यासाठी आता सातारा पालिकेने पुढाकार घेतला असून, ही उद्याने कात टाकू लागली आहेत.
अण्णासाहेब कल्याणी विद्यालयासमोर श्री. छ. प्रतापसिंह महाराज ऊर्फ दादा महाराज आयुर्वेदिक गार्डन साकारण्यात आले आहे. पंजाब राज्यातील सुनाम शहरातील हौसिंग गार्डनपासून प्रेरणा घेऊन सुमारे साडेतीन एकर विस्तीर्ण क्षेत्रावर हे वैशिष्ट्यपूर्ण उद्यान तयार करण्यात आले आहे. उद्यानात २३५ मीटर लांबीचा चालण्यासाठी पेव्हर पाथ-वे बनवला आहे. याशिवाय या गार्डनमध्ये विविध व्याधींचे निवारण करणारे आठ ट्रिटमेंट पाथ-वे बनवले आहेत. महिलांसाठी ओपन जीम उभारण्यात आली आहे. अनेक प्रकारच्या रंगीबेरंगी फुलझाडांची पुष्पवाटिका या उद्यानात तयार करण्यात आली आहे.
सुमित्राराजे उद्यानातही तीनशे मीटर लांबीचा वॉकिंग ट्रॅक तयार करण्यात आला आहे. याशिवाय जास्वंद, कर्दळ, रातराणी, सिंघोनिया अशी फुलझाडेही लावण्यात आली आहेत. बाळगोपाळांसाठी या बागेत नवीन खेळणीही बसविण्यात आली. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गुरुवार बागेचे नुकतेच अद्ययावतीकरण करण्यात आले आहे. या बागेत लॉन बसविण्यात आले असून, फुलझाडांची लागवडही करण्यात आली आहे. प्रतापसिंह उद्यानाच्या नूतनीकरणाचे काम सुरू असून, अर्कशाळेजवळील हुतात्मा उद्यान आबालवृद्धांना पर्वणी ठरत आहे. वॉकिंग ट्रॅक हा या बागेचे प्रमुख आकर्षण असून, पहाटे व सायंकाळी ही गर्दीने होत आहे.