कास तलाव भरल्याने पाणी प्रश्न निकालात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:27 AM2021-06-18T04:27:09+5:302021-06-18T04:27:09+5:30
शहराला पाणीपुरवठा करणारा कास तलाव दोन दिवसांपासून पडलेल्या मुसळधार पावसाने पूर्ण क्षमतेने भरला. तलावाच्या सांडव्यावरून गुरुवारी सकाळी मोठ्या प्रमाणावर ...
शहराला पाणीपुरवठा करणारा कास तलाव दोन दिवसांपासून पडलेल्या मुसळधार पावसाने पूर्ण क्षमतेने भरला. तलावाच्या सांडव्यावरून गुरुवारी सकाळी मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून सातारकरांची पाण्याची चिंता वर्षभरासाठी मिटली. कण्हेर, उरमोडी धरणाच्या पाणीपातळीतही वाढ होऊन भांबवली, एकीवचा धबधबा मोठ्या प्रमाणावर कोसळतानाचे चित्र आहे.
कास तलावाच्या पाणीपातळीत दिवसेंदिवस कमालीची घट होऊन, मागील महिन्यात पाणीपातळी मोठ्या प्रमाणावर खालावून अगदी साडेआठ फुटावर आली होती. पाणीटंचाईची समस्या उद्भवण्यापूर्वीच वळीव व तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्याने अतिवृष्टी होऊन चार फुटांनी पाणी वाढले. गेल्या दोन दिवसांच्या मुसळधार पावसाने सड्यावरून पाणी वाहून ओढे, नाले, झरे मोठ्या प्रमाणावर वाहल्याने आणखी सात फूट वाढ होऊन महिनाभरापासून पावसाच्या संततधार, मुसळधार पावसाने आज कास तलाव ओव्हरफ्लो झाला.
मे महिन्यात साताऱ्याच्या काही भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असताना दिवसेंदिवस पाणीपातळीत कमालीची घट होऊन कासचा पाणीसाठा अवघ्या साडेआठ फुटांवर आला होता. कालपासून पावसाने जोर धरत गुरुवारी सकाळपासून तलाव पूर्णक्षमतेने भरून वाहू लागला. चक्रीवादळाचा तडाखा व मान्सूनला वेळेपूर्वी झालेली सुरुवात यामुळे कासतलाव गतवर्षीपेक्षा १७ दिवस अगोदर पूर्णक्षमतेने भरण्यास मदत झाली.
कास परिसरात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडून तलावातील पाणीसाठा झपाट्याने वाढू लागला. मान्सूनच्या सुरुवातीच्या पावसात सात फुटांनी पाणीसाठा वाढून अर्धा टीएमसीच्या आसपास क्षमता असलेला कास तलाव आज पूर्णपणे भरला.
कोट
तौक्ते चक्रीवादळ, वळीव, मान्सून पावसाने कास परिसरात चांगली हजेरी लावली. गेल्या दोन- तीन दिवसांच्या जोरदार पावसामुळे तलाव गतवर्षीपेक्षा १७ दिवस अगोदर पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागला. कास तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून, सातारकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
-जयराम किर्दत, पाटकरी, कास तलाव
चौकट /
गतवर्षीपेक्षा यंदा १७ दिवस अगोदर कास तलाव भरला. चार वर्षांपूर्वी मृग नक्षत्राच्या आसपास मोठ्या स्वरूपात पाऊस पडून कास तलाव पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यावरून वाहायचा.
कास तलाव पूर्ण क्षमतेने वाहला
सन २०१५ - २३ जून
सन २०१६ - ३ जुलै
सन २०१७ - ३० जून
सन २०१८ - ५ जुलै
सन २०१९ - ६ जुलै
सन २०२० - ४ जुलै
सन २०२१- १७ जून
(छाया : सागर चव्हाण)