शाळेच्या निकृष्ट बांधकामाची दाखविली चित्रफीत

By admin | Published: December 24, 2014 11:26 PM2014-12-24T23:26:34+5:302014-12-25T00:04:42+5:30

पाटण पंचायत समिती सभा : अभियंता बनले ठेकेदार; राजेश पवार यांचा आरोप

The film shows the poor performance of the school | शाळेच्या निकृष्ट बांधकामाची दाखविली चित्रफीत

शाळेच्या निकृष्ट बांधकामाची दाखविली चित्रफीत

Next

पाटण : ‘तालुक्यातील पाळशी, पळासरी, उधवणे, धोंडेवाडी या प्राथमिक शाळांच्या इमारत बांधकामांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असून, बांधकामे दोन वर्षांपासून अपूर्ण आहेत. बांधकाम न करताच मुख्याध्यापकांनी बँक खात्यावरील पैसे काढले तर बांधकामाचे मूल्यमापन करणारे इंजिनिअर्सच ठेकेदार बनले आहेत. त्यामुळे उत्कृष्ट बांधकामाच्या त्यांच्याकडून काय अपेक्षा करायच्या,’ असा आरोप सदस्य राजेश पवार यांनी केला.
पाळशी येथील शाळा इमारत बांधकामाची दुर्दशा दाखविणारी मोबाईल चित्रफीत उपसभापती डी. आर. पाटील यांनी दाखविली. त्यामुळे पाटण पंचायत समितीच्या मासिक सभेत उपस्थित सदस्य व अधिकारी आवाक् झाले.
सभापती संगीता गुरव यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीची सभा झाली. शाळा इमारत बांधकामावर बोलताना राजेश पवार म्हणाले, ‘इंजिनिअर्स स्वत:च्या भावाच्या मुलाच्या किंवा नातेवाइकांच्या नावावर ठेकेदारी करत असून, निकृष्ट बांधकामामुळे शाळा इमारतींचा विद्यार्थ्यांना धोका संभवतो.’
‘खोट्या पद्धतीने पटपडताळणी करून शिक्षक नेमणाऱ्यांवर कारवाई करा,’ अशी मागणी रामभाऊ लाहोटी यांनी केली. ‘पाईका’ योजनेअंतर्गत शाळेच्या मैदानासाठी लाखो रुपये अनुदान आले आहे. ते ग्रामपंचायत खात्यावर पडून आहे. त्याबाबत कार्यवाही व्हावी, ’असे विजय पवार म्हणाले. ‘अंगणवाडी सेविका व मदतनिसांना वाढीव आलेले अनुदान त्वरित देण्यात यावे, अशी मागणी लाहोटी यांनी केली. काठी-अवसरी येथे चार दिवसांपासून वीजपुरवठा बंद आहे,’ असे शोभा कदम म्हणाल्या. ‘पाटण तालुक्यात मुलींच्या जन्माचे प्रमाण जास्त असून, दर हजारी पुरुषांमागे १,०४८ स्त्रिया इतके आहे,’ असे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक साळुंखे यांनी सांगितले. तर मोरगिरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर कामचुकारपणा करतात,’ असे सदस्य नथुराम कुंभार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

रविवारी ९६ गावांची बैठक
‘कस्तुरी रंगन समितीने पाटण तालुक्यातील ९६ गावे इको सेन्सेटिव्ह म्हणून जाहीर केली आहेत. त्या ग्रामपंचायतींच्या हरकती मागविल्या आहेत. तेव्हा पुढील दिशा ठरविण्यासाठी अभयारण्य व सह्याद्री व्याघ्र प्रकल्पबाधित गावांची तसेच ९६ गावांची महत्त्वाची बैठक रविवारी २८ डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता कोयनानगर येथे आहे,’ अशी माहिती मानवी हक्क संरक्षण समितीचे अध्यक्ष तथा माजी सभापती राजाभाऊ शेलार यांनी सभागृहात दिली.


डॉक्टरांची अरेरावी...
तारळे प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर हे अरेरावीपणा करत असून, उपसभापती व पंचायत समिती सदस्यांसमोर दादागिरीची भाषा, नर्सबरोबर बाचाबाची करतात. त्यांचे मोबाईल संभाषण ऐकवत उपसभापती डी. आर. पाटील यांनी कडक कारवाईची मागणी केली.

Web Title: The film shows the poor performance of the school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.