फलटण-बारामती सुधारित रेल्वे मार्गाला अखेर मंजुरी
By Admin | Published: October 23, 2015 10:03 PM2015-10-23T22:03:41+5:302015-10-24T00:57:27+5:30
८५४ कोटींचा अंदाजित खर्च : लवकरच कामाला सुरुवात होणार
फलटण : फलटण-बारामती रेल्वे मार्गाचे दोन वेळा सर्वेक्षण झाले होते. मात्र, त्यातील काही मार्गांमध्ये अडचणी आल्यामुळे पुढील कामकाज ठप्प झाले असताना खासदार शरद पवार यांनी सुचविलेला सुधारित रेल्वे मार्ग मंजूर झाला असल्याची माहिती कृती समितीचे अध्यक्ष सुभाष शिंदे यांनी दिली.
नवी दिल्ली येथे नुकतीच रेल्वे खात्याशी संबंधित अधिकाऱ्यांशी बैठक झाली. या बैठकीस शरद पवार, केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचे खासगी सचिव संजीवकुमार रेल्वे बोर्डाचे कार्यकारी संचालक वेदप्रकाश दुडेजा आदी उपस्थित होते.
यावेळी सुधारित रेल्वे मार्गाचा सर्व्हे करून सेंट्रल रेल्वेने आपला अहवाल रेल्वे बोर्डाला दिल्याची माहिती संजीवकुमार यांनी दिली.
या नव्या प्रस्तावित मार्गामध्ये बारामतीच्या अलीकडे न्यू बारामती जंक्शन असा बदल होणार आहे. फलटण तालुक्यातील सस्तेवाडी, शिंदेवाडी, कांबळेश्वर व खुंटे या गावाजवळून हा मार्ग जात आहे. बारामती तालुक्यातील माळवाडी, ढाकळे व न्यू बारामती अशी स्थानके प्रस्तावित असल्याची माहिती शिंदे यांनी दिली. (प्रतिनिधी)