मेडिकल कॉलेजसाठी अंतिम परवानगी द्यावी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:44 AM2021-08-13T04:44:00+5:302021-08-13T04:44:00+5:30
कऱ्हाड : सातारा मेडिकल कॉलेजमध्ये पुढील वर्षापासून प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यासाठी तयार असलेल्या पर्यायी ठिकाणी सर्व पायाभूत सुविधा राज्य ...
कऱ्हाड : सातारा मेडिकल कॉलेजमध्ये पुढील वर्षापासून प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यासाठी तयार असलेल्या पर्यायी ठिकाणी सर्व पायाभूत सुविधा राज्य शासनाने उपलब्ध करून दिल्या. मात्र, राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या पाहणी दौऱ्याअभावी ही प्रवेश प्रक्रिया प्रलंबित राहिली आहे. त्यामुळे पाहणी करून त्यासाठी आवश्यक असणारी अंतिम परवानगी तातडीने द्यावी, अशी मागणी खासदार श्रीनिवास पाटील यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांच्याकडे केली.
लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनासाठी खासदार श्रीनिवास पाटील हे सध्या दिल्ली येथे असून, सातारा मेडिकल कॉलेजबाबत त्यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांची भेट घेतली.
यावेळी खासदार पाटील म्हणाले, सातारा मेडिकल कॉलेजसाठी राज्य शासनाने मंजुरी दिली असून, त्यासाठी ४९५ कोटींचा भरीव निधी व ६२ एकर जमीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. कॉलेजसाठी मंजूर असलेल्या जागेवर इमारत बांधली जाणार असून, त्यासाठीची प्रक्रिया सुरु आहे. येत्या काही दिवसात मेडिकल कॉलेजची भव्य आणि सुसज्ज इमारत उभी राहील. मात्र तोपर्यंत कॉलेजची प्रवेश प्रक्रिया रखडू नये, कॉलेज प्रत्यक्ष सुरु व्हावे यासाठी तात्पुरत्या स्वरूपात सातारा येथे तयार असलेल्या पर्यायी इमारतीत कॉलेज सुरु करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. त्याबद्दल शैक्षणिकदृष्ट्या लागणाऱ्या सर्व पायाभूत सोयी-सुविधा राज्य शासनाने उपलब्ध करून दिल्या आहेत.
या कॉलेजमध्ये शंभर एमबीबीएस विद्यार्थ्यांची पहिली तुकडी शैक्षणिक वर्ष २०२१पासून सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी लेक्चर रूम, स्किल लॅब आणि सेंट्रल रिसर्च लॅबसह चार प्रयोगशाळा, डिजिटल लायब्ररीसह केंद्रीय ग्रंथालय, मुला-मुलींसाठी वसतिगृह सुविधा, खेळाचे मैदान आणि इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. याशिवाय राज्य सरकारने केंद्रीय प्रयोगशाळेच्या विकासासाठी तेरा कोटी रुपये मंजूर केले आहेत. तसेच इतर अध्यापन सुविधांसाठी सर्व प्रथम वर्षांच्या प्रयोगशाळेच्या उपकरणे खरेदीसाठी साडेसहा कोटी रुपयांचा अतिरिक्त निधीही मंजूर केला आहे. मात्र, मेडिकल कॉलेज सुरू करण्यासाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडून पाहणी होऊन आवश्यक परवानगी मिळणे आवश्यक आहे. केंद्रीय पातळीवरील ही परवानगी तातडीने द्यावी, अशी मागणी खासदार श्रीनिवास पाटील यांनी मंत्री मनसुख मांडवीय यांच्याकडे भेटीदरम्यान केली आहे.