फेरतपासणीचा अहवाल अंतिम टप्प्यात
By admin | Published: July 8, 2014 11:38 PM2014-07-08T23:38:25+5:302014-07-09T00:04:57+5:30
देऊर सोसायटी अपहार : कोण कोण अडकणार, याचीच नागरिकांना उत्सुकता
वाठार स्टेशन : जिल्ह्यातील सर्वात मोठी अफरातफर झालेल्या देऊर विकास सोसायटीतील फेरतपासणी अहवाल अंतिम टप्प्यात असून या घोटाळ्यात नक्की कोण-कोण अडकणार याची उत्सुकता तालुक्याला लागली आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या देऊर विकास सेवा सोसायटीत कोट्यवधी रुपयांची अफरातफर झाल्याचा गौप्यस्फोट सर्वप्रथम ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यानंतर या भ्रष्टाचाराची चौकशी गतिमान झाली.
मार्च २०१४ या आर्थिक वर्षात प्रथमदर्शनी ४ लाखांची अफरातफर असल्याची बाब कोरेगाव सहायक उपनिबंधक यांनी जाहीर केल्यानंतर याची सखोल चौकशी करण्याची भुमिका विद्यमान संचालक मंडळाने घेतली. यासाठी लेखापरिक्षक विनोद साबळे यांनी काम सुरू केले. त्यांनी सभासद सचिव संचालक मंडळांना नोटिसा बजावून अहवाल पूर्ण केला.
त्यामध्ये जवळपास १ कोटी ८० लाखांपर्यंत भ्रष्टाचाराचा आकडा दिला. परंतु विनोद साबळे या लेखापरिक्षकाने जिल्हा निबंधकांच्या परवानगीशिवाय केलेला अहवाल ग्राह्य धरला जाणार नाही.फेर लेखापरिक्षण करण्याचे काम कणसे यांना देण्यात आले आहे. (वार्ताहर)