ऊस वाहतूक अंतिम टप्प्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:38 AM2021-03-21T04:38:05+5:302021-03-21T04:38:05+5:30
जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांनी यंदा चांगला गळीत हंगाम केला आहे. ऊसतोड आता अंतिम टप्प्यात असून, ट्रॅक्टरमधून वाहतूक केली जात ...
जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांनी यंदा चांगला गळीत हंगाम केला आहे. ऊसतोड आता अंतिम टप्प्यात असून, ट्रॅक्टरमधून वाहतूक केली जात आहे. (छाया : जावेद खान)
फोटो १९शुगरकेन
०००००००००००
वसुली मोहीम तेजीत
सातारा : साताऱ्यातील गल्ली-बोळातून वसुली मोहीम जोरात सुरू आहे. मार्चअखेर असल्याने सातारा पालिका, वीज वितरण कंपनीच्या गाड्या थकबाकी भरण्याबाबत जनजागृती करत फिरत आहेत. तसेच काही ठिकाणी कारवाईचा बडगाही उगारला जात आहे.
०००००
वादावादीचे प्रसंग
सातारा : जिल्ह्यात बहुतांश शासकीय कार्यालयांनी थकबाकी वसुलीला सुरुवात केली आहे. मात्र शासनाकडून आणखी सवलत मिळेल किंवा माफी होईल, या आशेने ते थकबाकी भरण्यास ग्राहक तयार नाहीत. यातून वरिष्ठांचा दट्ट्या असल्याने कर्मचारी वसुलीला गेले, तर गावपुढारी विरोध करून वादावादी करीत आहेत.
०००००
ज्येष्ठांची उद्या सभा
सातारा : शाहूपुरी येथील निरामय ज्येष्ठ नागरिक संघ, गेंडामाळ परिसर यांची वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार, दि. २२ रोजी सकाळी सव्वाअकरा वाजता आयोजित केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्हिडिओ काॅन्फरन्सद्वारे ही सभा होणार आहे, अशी माहिती कार्यवाह शकुनी कुलकर्णी यांनी दिली आहे.
०००
भिंतीची पेन्टिंग
सातारा : सातारा शहरासह जिल्ह्यातील प्रमुख शहरांमधील भिंतीवर सामाजिक संघटनांच्यावतीने आकर्षक पेन्टिंग केली जात आहे. यामध्ये व्यंगचित्रे काढली जात आहेत. त्यामुळे शहराला वेगळा लूक आला आहे. त्यामुळे लहान मुलांमध्येही चित्रांविषयी आकर्षण निर्माण होत आहे.
००००००
पाणी पुरवठा खंडित
सातारा : साताऱ्यातील बहुतांश भागात पाणीसाठा चांगला असला, तरी उन्हाळ्यात तीव्र झळा सोसाव्या लागू नयेत, म्हणून प्रशासन आतापासूनच सावध झाले आहे. आतापासूनच आठवड्यातून एक दिवस पाणी पुरवठा खंडित केला जात आहे किंवा कमी दाबाने पाणी सोडले जात आहे.
०००००००
महाबळेश्वरकरांना प्रतीक्षा उन्हाळी हंगामाची
महाबळेश्वर : महाबळेश्वरमध्ये उन्हाळ्यात राज्याच्या कानाकोपऱ्यासह जगभरातून पर्यटक थंड हवेसाठी येत असतात. मात्र कोरोनाचे सावट अजूनही कमी झाले नसून, रुग्ण वाढतच आहेत. त्यामुळे हा हंगाम कसा जाणार, याची चिंता सतावत आहे. पर्यटक आले, तरी त्यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याचाही धोका असल्याने काय करावे, या मनस्थितीत आहेत.
००००००००
भाजी विक्रेते रस्त्यावर
सातारा : साताऱ्यातील राजवाडा भाजी मंडईतील विक्रेत्यांची आत बसण्याची मानसिकताच होत नसल्याने रात्री या मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या संख्येने भाजी विक्रेते बसलेले असतात. त्यातूनच वाहनांचीही वर्दळ असते. त्यामुळे पादचाऱ्यांना नीट चालताही येत नाही.
०००००००
दंडात्मक कारवाई करा
सातारा : साताऱ्यातील महात्मा फुले भाजी मंडईत दर रविवारी भरत असलेल्या आठवडा बाजारात असंख्य लोक मास्कचा वापर करत नाहीत. त्यामुळे असे विक्रेते तसेच ग्राहकांवर पोलीस व पालिकेने दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी सातारकरांमधून केली जात आहे.
००००००
रसवंतीगृह सुरू
सातारा : साताऱ्यासह ग्रामीण भागात उष्णतेचा कडाका वाढू लागला आहे. त्यामुळे फळांचा ज्युस तसेच उसाच्या रसाना चांगली मागणी वाढत आहे. ही बाब लक्षात घेऊन शहरात तसेच रस्त्याच्या कडेला रसवंतीगृहे सुरू झाली आहेत. महामार्गावर सलग प्रवास करून थकलेली मंडळी या ठिकाणी रसाचा आनंद घेत आहेत.
००००
टोप्यांना मागणी
सातारा : कडक उन्हापासून बचाव करण्यासाठी साताऱ्यातील दुचाकी चालविणाऱ्यांमधून टोप्यांना मागणी वाढत आहे. विशेष म्हणजे पारंपरिक टोप्यांबरोबरच वाळ्याच्या टोप्यांना चांगली मागणी आहे. ती भिजवल्यानंतर कित्येक तास थंडावा देत असल्याने दिलासा मिळत आहे.
०००००००
दोऱ्या नावाला
सातारा : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सुरक्षित अंतर राखण्यासाठी दोऱ्या बांधल्या जात होत्या. आता त्या बांधण्यास सुरुवात झाली आहे. पण ग्राहक दोरीसह आत जाऊन खरेदी करत आहेत. त्यामुळे ही उपाययोजना नावालाच ठरत आहे.
००००००००
शांततेच्या ठिकाणी विद्यार्थी अभ्यासासाठी
सातारा : दहावी, बारावीच्या परीक्षा काही दिवसांवर आल्या आहेत. त्यामुळे मुलांचा चांगल्याप्रकारे अभ्यास सुरू आहे. प्रशासनाचा कशाही पद्धतीने पेपर घेण्याचा निर्णय झाला, तरी आपण कमी पडायला नको म्हणून अनेक मुले दुपारच्यावेळी निर्जन ठिकाणी अभ्यासासाठी जात आहेत. यामध्ये शहरातील बागा, मंदिरे, डोंगरकपारी जात आहेत. तसेच रात्रीही उशिरापर्यंत जागरण करून ते अभ्यास करत असतात.
०००००००
स्कार्पचा वापर
वडूज : माण, खटाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या झळा बसायला लागल्या आहेत. उन्हापासून बचाव करण्यासाठी स्कार्पचा वापर केला जात आहे. यामध्ये शाळा-महाविद्यालयीन तरुणी ड्रेसवर मॅच होतील, अशा पद्धतीचे स्कार्प, ट्रोल खरेदी करत आहेत.
००००००
पाणपोईची गरज
दहिवडी : माण तालुक्यात उन्हाच्या झळा बसायला लागल्या आहेत. त्यामुळे बाहेर गावाहून आलेल्ल्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरात सार्वजनिक ठिकाणी पाणपोईची सोय करावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
०००००
छत्रपती शिवाजी महाविद्यालयात प्रशिक्षण
सातारा : साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी महाविद्यालयात ग्रंथालय व्यवस्थापन प्रशिक्षण आयोजित केले आहे. यामध्ये एप्रिल ते जून या तीन महिन्यांसाठी हे प्रशिक्षण असणार आहे. यासाठी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यामुळे याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्य डाॅ. विठ्ठल शिवणकर यांनी केले आहे.