‘कृष्णा’ कारखान्याची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:42 AM2021-05-07T04:42:12+5:302021-05-07T04:42:12+5:30

कराड : रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची अंतिम मतदार यादी गुरुवारी (दि.6 ) ...

Final voter list of 'Krishna' factory released! | ‘कृष्णा’ कारखान्याची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध!

‘कृष्णा’ कारखान्याची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध!

Next

कराड : रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची अंतिम मतदार यादी गुरुवारी (दि.6 ) प्रसिद्ध झाली. साखर संघ पुणे व कारखाना कार्यस्थळावर ही यादी एकाच वेळी प्रसिद्ध करण्यात आली असल्याची माहिती पुणे साखर संघाचे प्रादेशिक सहसंचालक धनंजय डोईफोडे यांनी दिली. या यादीत 46 हजार 340 मतदारांचा समावेश आहे.

सातारा व सांगली जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक नजीकच्या काळात होऊ घातली आहे. गेले वर्षभर कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. मात्र काही सभासदांनी निवडणूक प्रक्रिया त्वरित राबवावी म्हणून न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर न्यायालयाच्या निर्देशानुसार या प्रक्रियेला गती प्राप्त झाली आहे.

कृष्णा कारखाना निवडणुकीच्या अनुषंगाने 12 एप्रिल रोजी सभासदांची कच्ची मतदार यादी प्रसिद्ध झाली होती. त्यावर 22 एप्रिल पर्यंत हरकती घ्यायची मुदत होती. या कालावधीत 158 हरकती दाखल झाल्या होत्या. त्या हरकतींवर 27 एप्रिल रोजी सुनावणी झाली. त्याचा निकाल 3 मे रोजी जाहीर झाला .त्यात 130 हरकती फेटाळण्यात आल्या. फक्त 28 हरकती मंजूर करण्यात आल्या होत्या. हे सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर गुरुवारी ( दि. 6) सभासदांची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. यात 46 हजार 340 पात्र मतदारांचा समावेश आहे .तर पुरवणी यादीत 820 सभासदांचा समावेश आहे.

कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठेची मानली जाते. सातारा व सांगली जिल्ह्यातील काही तालुक्यात याचे सभासद असल्याने दोन्ही तालुक्यातील नेत्यांचा येथे कस लागल्याचे पाहायला मिळते. आता निवडणूक कार्यक्रम प्रत्यक्ष कधी जाहीर होणार? याचीच उत्सुकता सभासदांना लागलेली दिसते. नजीकच्या काळात कृष्णाची रणधुमाळी अनुभवायला मिळेल.अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

Web Title: Final voter list of 'Krishna' factory released!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.