अखेर डाव मांडला..‘कॅप्टन’ची कसोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 10:41 PM2019-02-19T22:41:41+5:302019-02-19T22:41:46+5:30

सातारा : सातारा नगरपालिकेचा कारभार सध्या सुरू आहे तसाच सुरू राहिला तर आपली काही डाळ शिजणार नाही. याची जाणीव ...

Finally, the captain's Test | अखेर डाव मांडला..‘कॅप्टन’ची कसोटी

अखेर डाव मांडला..‘कॅप्टन’ची कसोटी

Next

सातारा : सातारा नगरपालिकेचा कारभार सध्या सुरू आहे तसाच सुरू राहिला तर आपली काही डाळ शिजणार नाही. याची जाणीव झालेल्या अनेकांना पोटशूळ उठलाय. नियमातून काम होणार नाही म्हटल्यावर नगराध्यक्षांनाच दूर करण्याची खेळी पुन्हा एकदा खेळली गेली. कूल कॅप्टन सहज आऊट होणार नाहीत म्हटल्यावर त्यांना धावचित करण्याचा खेळ खेळला जातोय; पण मॅच जिंकण्याच्या उद्देशाने मैदानात आलेल्या कॅप्टनला सहज धावबाद करणेही सोपे नाही. त्यासाठी संघ सूत्रधारांकडेच कॅप्टननी डाव सोडावा, यासाठी इतर खेळाडूंनी बांधणी केली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून सातारा विकास आघाडीतील नगरसेवक आणि नगराध्यक्षांमध्ये रुसवे फुगवे सुरू आहेत. ठराविक नगरसेवकांची कामे होतात आणि ठराविकांची होत नाहीत, अशी तक्रार करून आघाडी प्रमुखांनीच याबाबत निर्णय घेण्याची विनंती
करण्यात आली. त्यामुळे कामांसाठी आग्रही असलेल्या खासदार उदयनराजे भोसले यांनी नगराध्यक्षांनाही सुनावत ‘असे चालणार नाही. काम
करायचे नसेल तर राजीनामा देऊन मोकळे व्हा,’ असे खडे बोल सुनावले. यामुळे दुखावलेल्या नगराध्यक्षांनी सर्वांची इच्छा असेल तसेच होईल, अशी अगतिकता दाखविली; पण प्रत्यक्षात त्यांना आणि इतरांनाही हे सहज होणार नाही, याची जाणीव आहे.
शहरात सुरू असलेल्या विविध विकासकामांमध्ये नगरसेवकांच्या कामांचा समावेश केला जात नाही, असा आरोप नगराध्यक्षांवर लावला जात असला तरी त्यांनी प्रत्येक नगरसेवकाला समान न्याय कसा मिळेल, याचे नियोजन केले आहे; पण इथे समान न्याय कोणाला पाहिजे. प्रत्येकाला आपल्या प्रभागातच जास्तीत जास्त कामे व्हावीत, असे वाटणार. ही सहज भावना असली तरी देखील मुद्दाम काही विषय पत्रिकेमध्ये घुसण्याचा प्रयत्न सुरू असतो. त्याला यश येत नसल्यामुळेच नगराध्यक्षांच्या तक्रारींबद्दलचा सूर वाढत आहे; पण एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, एखाद्या प्रमुखाविरोधात तक्रारी वाढू लागल्या की तो योग्य मार्गावर आहे आणि योग्य निर्णय घेत आहे, असे समजायला हरकत नाही; पण सातारा पालिकेच्या आणि नगराध्यक्षांच्या बाबतीत तसे होताना दिसत नाही.
नगराध्यक्षांच्या उपस्थितीतच काहींना नगरपालिका स्वत:ला चालवायची आहे. आपण सांगू त्याप्रमाणे नगराध्यक्षांनी निर्णय घ्यावेत. आपल्या हो ला हो करावे आणि चुकीचे होत असले तरी गप्प राहावे. या अपेक्षा सत्ताधारी आघाडीतील नगरसेवकांच्या आहेत. त्यामुळे कामही करता येत नाही आणि गप्पही राहता येत नाही, अशी अवस्था नगराध्यक्षांची झाली आहे; पण सध्या सर्व टीमच विरोधात असल्याने सामना कसा जिंकायचा? हाच प्रश्न नगराध्यक्षांपुढे पडला आहे. एक-एक धाव करत उद्दिष्टापर्यंत पोहोचायचे की डाव घोषित करून टाकायचा, या विवंचनेत नगराध्यक्ष आहेत.
सामना नगरपालिकेतील असो किंवा मैदानातील... जेव्हा लढण्याचा निर्णय घेतला जातो तेव्हा विरोधी संघातील खेळाडू असोत किंवा आपल्याच संघातील. कधी गुगली पडते तर कधी शेवटच्या चेंडूवरही षटकार बसतो आणि सामना पूर्णपणे फिरतो. त्यामुळे शेवटच्या चेंडूपर्यंत आशा सोडायची नसते. मैदानावरील खेळाचा हा नियम सर्वत्रच लागू पडतो. त्यामुळे कोणाच्याही दबावाला किंवा आव्हानाला धैर्याने सामोरे जाणे आणि काही प्रमाणात जुळवून घेत आपला डाव पूर्ण करावाच लागणार आहे. हार-जीतचा निर्णय काळ ठरवेल त्यासाठी आत्ताच हताश होऊन चालणार नाही.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी एकत्र राहून निवडणुकीसाठी काम करावे, अशी खासदार उदयनराजेंची अपेक्षा असणार. त्यासाठी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांमध्ये समन्वय साधण्याचा त्यांनी अनेकदा प्रयत्नही केला. एकत्र या, चांगली कामे करा, अशा सूचनाही केल्या. कधी कानउघडणी सुद्धा केली; पण त्याचा फार काही फरक पडलेला दिसत नाही. ज्यांच्यामुळे सत्ता मिळाली, पदे मिळाली त्यांच्यासाठी आता काम करण्याची वेळ आली आहे. त्याच दृष्टिकोनातून काहींना कायम पदभार दिला तर काहींची नव्याने पदरचना करण्याचे नियोजन केले जात आहे.
पालिकेचे कारभारी नेमके कोण
सातारा नगरपालिकेत नगराध्यक्ष या केवळ कठपुतली असतील आणि कारभार दुसरेच करतील, अशी शक्यता निवडणुकीच्या सुरुवातीलाच वर्तविण्यात आली होती. ते खरे करण्याचा प्रयत्न नगरपालिकेत सुरू आहे; पण ‘असे होणार नाही,’ असे नगराध्यक्षांनी दिलेले आश्वासन त्यांना पाळावे लागेल. कारभाऱ्यांना बाजूला सारून आपला अजेंडा राबवावा लागेल. काही झाले तरी जनतेची फसवणूक होणार नाही, याबाबत सजग राहावे लागेल.
नेते कोण अन् मुजरा कोणाला?
पालिकेचे राजे आपणच आहोत, अशा अविर्भावात काहीजणांचा पालिकेत वावर आहे. त्यामुळे काही नगरसेवकही पालिकेतील राजेंना मुजरा करूनच कामकाजाला सुरुवात करतात. ज्यांना लोकांनी पालिकेत निवडून देणे टाळले, ते मागील दाराने आले आणि तिखट झाले. तर विद्यमान पदाधिकाºयांना आपले पद कधीही जाऊ शकते, याची भीती सतत सतावत आहे. आपल्यावर मेहरनजर राहावी, यासाठी ही मुजºयाची उठाठेव आहे.

Web Title: Finally, the captain's Test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.