अखेर मारहाणीचा गुन्हा दाखल
By admin | Published: March 9, 2015 10:24 PM2015-03-09T22:24:41+5:302015-03-09T23:48:47+5:30
सातारा : ‘लोकमत’च्या वृत्ताची गंभीरपणे दखल
सातारा : येथील कोंडवे रस्त्यावर रविवारी मारहाण करून जखमी केल्याप्रकरणात अखेर पोलिसांनी संबंधित अनोळखी आरोपीच्या विरोधात मारहाणीचा गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांनी यापूर्वी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली होती. ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. याबाबत माहिती अशी की, संतोष दयाराम कणसे (वय ३३, रा. कोंडवे) हा रविवारी सायंकाळी पाचच्या दरम्यान मोळाचा ओढा येथून जात होता. त्यावेळी त्याने एकाला गाडी वाकडीतिकडी का चालवतोस ? नीट चालवता येत नाही का, अशी विचारणा केली. त्यामुळे दुचाकी (एमएच १२ डीझेड ४८९६) वरील अनोळखीने कणसेला शिवीगाळ करीत मारहाण केली. त्यानंतर जवळील बिअरची बाटली कणसेच्या डोक्यात फोडली. यामध्ये कणसे जखमी झाला होता. याप्रकरणात रविवारी सातारा तालुका पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली होती. याबाबत ‘लोकमत’ने आवाज उठविल्यानंतर सोमवारी पोलिसांनी मारहाणीचा गुन्हा नोंद केला आहे. संतोष कणसे याने तक्रार दिली असून, हवालदार संपत जाधव यांनी गुन्हा दाखल केला. हवालदार जी. बी. भिसे अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)