ग्रेड सेपरेटरमध्ये स्टंटबाजी करणाऱ्यावर अखेर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:39 AM2021-03-05T04:39:47+5:302021-03-05T04:39:47+5:30
सातारा : ग्रेड सेपरेटरमध्ये स्टंटबाजी करणाऱ्या युवकाला वाहतूक शाखेच्या पोलिसांनी महिन्याभरानंतर शोधून काढले असून, शहर पोलीस ठाण्यात त्याच्यावर ...
सातारा : ग्रेड सेपरेटरमध्ये स्टंटबाजी करणाऱ्या युवकाला वाहतूक शाखेच्या पोलिसांनी महिन्याभरानंतर शोधून काढले असून, शहर पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
ऋतुराज राजेंद्र करंजे (वय २७, रा. दाैलतनगर, करंजे तर्फ सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, काही महिन्यांपूर्वी ऋतुराजने ग्रेड सेपरेटरमध्ये दुचाकीसह जीवघेणी स्टंटबाजी करून आपल्या मित्रांच्या सहकाऱ्याने त्याचे चित्रीकरण केले. त्यानंतर त्याने हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले होते. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करून जीवघेणी स्टंटबाजी समोर आणली होती. शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार यांनी आपल्या पथकाला संबंधित युवकाचा शोध घेण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार कर्मचाऱ्यांनी अखेर स्टंटबाजी करणाऱ्या ऋतुराज करंजे याला शोधून ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्यावर मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
ग्रेड सेपरेटरमध्ये सुरक्षित वाहतुकीसाठी यापुढेदेखील नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांच्या विरोधात विशेष मोहीम तीव्र करण्यात येणार आहे. त्यामुळे युवकांनी कसलीही जीवघेणी स्टंटबाजी करू नये, असे आवाहनही शेलार यांनी केले आहे.