अखेर ‘कृष्णा’ होतेय विळख्यातून मुक्त !
By admin | Published: April 18, 2017 11:13 PM2017-04-18T23:13:30+5:302017-04-18T23:13:30+5:30
कृष्णा नदीपात्राची स्वच्छता : पाच टन जलपर्णी हटवली; मोहिमेसाठी नगरसेवकांचा पुढाकार, बोट अन् जेसीबीचा वापर
कऱ्हाड : कृष्णा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी सध्या सर्वत्र प्रयत्न केले जात आहेत. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव काळात नदी प्रदूषण होऊ नये म्हणून सामाजिक संस्था, एन्व्हायरो नेचर क्लब व पर्यावरण संस्थांकडूनही काळजी घेतली जाते. सध्या नदी प्रदूषणाबाबत नुकतीच पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी पाहणी केल्यानंतर जलपर्णी काढण्याच्या कामास मंगळवारपासून प्रत्यक्ष प्रारंभही करण्यात आला. दिवसभरात तब्बल पाच टन जलपर्णी काढण्यात आल्या. व कृष्णा नदीपात्रातील काही भाग स्वच्छ करण्यात आला.
येथील कृष्णा नदीपात्रात वाढलेल्या जलपर्णींमुळे नदीपात्रातील पाणी मोठ्या प्रमाणात दूषित झाले होते. तसेच अजूनही होत आहे. अनेकवेळा पाण्याचा रंग आणि चवही बदलली होती. त्यामुळे नदीकाठच्या गावातील गावकऱ्यांसह शहरातील नागरिकांना हे दूषित पाणी प्यावे लागत होते. शहरातील तसेच परिसरातील कंपनीमधून नदीत मिसळणाऱ्या सांडपाण्यामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णींची वाढ झाली आहे. त्यामुळे नदीतील पाण्यामध्ये असलेल्या जलचर प्राण्यांना याचा मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होऊ लागला आहे. तर दुसरीकडे नदी प्रदूषणातही वाढ होऊ लागले आहे. हे लक्षात घेत येथील आरोग्य विभागाचे सभापती विजय वाटेगावकर यांच्यासह नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, नगरसेवक विनायक पावसकर, नगरसेवक भोसले, कश्मिरा इंगवले, पालिकेचे अधिकारी ज्ञानदेव जगताप, आरोग्य विभागाचे अधिकारी आटवाडकर यांनी मंगळवारी सकाळी कृष्णा नदीकाठची पाहणी करीत जलपर्णी काढण्याच्या कामास सुरुवात केली. यावेळी पंधरा ते सोळा स्थानिक युवकांच्या पुढाकाराने व पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या साह्याने सुमारे पाच टन जलपर्णी काढण्यात आल्या.
कऱ्हाड ते टेंभूपर्यंत मोठ्या प्रमाणात सांडपाण्यामुळे जलपर्णींचे प्रमाण वाढले आहे. नदी प्रदूषणाबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाकडूनही पालिकेस अनेक वेळा नोटिसा देण्यात आलेल्या आहेत. गेल्यावर्षी दिलेल्या नोटिसीनंतर पालिकेच्या वतीने नदीची स्वच्छता करण्यात आली होती. याही वर्षी नदी प्रदूषणाचे वाढते प्रमाण लक्षात घेता पालिकेच्या वतीने कृष्णा नदीतील जलपर्णी काढण्यास प्रारंभ करण्यात आला.
कृष्णा-कोयना नदीपात्रात गोवारे हद्दीपर्यंत सध्या मोठ्या प्रमाणात जलपर्णी या फोफावलेल्या आहेत. येथील जुन्या कोयना पुलापासून गोवारे हद्दीपर्यंत सुमारे तीसहून अधिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात जलपर्णींनी नदीपात्राला वेढलेले आहे. जलपर्णींची झपाट्याने होणारी वाढ व त्यामुळे होत असलेले दूषित पाणी त्याचा नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेत पालिकेने यांत्रिक बोटी, जेसीबी तसेच ट्रॅक्टरच्या साह्याने कृष्णा-कोयना नदीपात्रातील स्मशानभूमी परिसरातील जलपर्णी काढण्यास सुरुवात केली आहे. पालिकेतील आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांसह पंधरा ते सोळा युवकांच्याकडून हे काम केले जात आहे. काम अजूनही तीन ते चार दिवस केले जाणार आहे.
नदीकाठचे व शहरालगतचे अनेक ठिकाणचे ओढे-नाले थेट नदीपात्रात मिसळत असल्याने जलपर्णींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्याचा नदीतील पाण्यावरही परिणाम होत आहे.
नुकतीच कृष्णा नदीकाठची व कृष्णा घाट परिसराची भाजप पदाधिकारी व पालिकेच्या नगराध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांनी देखील पाहणी केली आहे. त्यामुळे आता प्रत्यक्ष कामास ्र्रपालिकेच्या पदाधिकारी व नगरसेवकांनी सुरुवात केली असल्यामुळे शहरातील नागरिकांतूनही समाधान व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)
जलपर्णीची मुळे घट्ट
कृष्णा-कोयना नदीपात्रातून पालिकेकडून काढण्यात आलेल्या जलपर्णींची पाने ही हिरव्या रंगाची होती. ती नदीपात्रातून बाहेर काढण्यासाठी लांब काठ्यांचा वापर करावा लागला. पाण्यावर तरंगत असलेल्या जलपर्णींची मुळे एकमेकांत घट्ट गुंतलेली असल्याने काढण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या.